Amruta Fadnavis, Eknath Khadse (PC - Instagram, PTI)

Amruta Fadnavis On Eknath Khadse: गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. एमआयडीसीची कथित जमीन माझ्या बायको आणि जावयाने घेतली. मी मंत्री असताना माझ्या कुटुंबाने व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी एखादा व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का?, असा सवाल खडसे यांनी केला होता. यास आता अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की, 'तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही. सर्वांचे भले होवो, असा टोलादेखील अमृता फडणवीस यांनी खडसे यांना लगावला आहे. (हेही वाचा - Devendra Fadnavis On Eknath Khadse: 'मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही' भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर)

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार निवडणूकीवरून टीका केली होती. यासंदर्भात बोलताना एकनाथ खडसे म्हणाले होते की, फडणवीस यांना बिहार विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपात युती आहे. त्यामुळे आमचे सरकार येईल, अशी आशा करतो. पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकच अपेक्षा करतो, त्यांनी महाराष्ट्रात जे राजकारण खेळले, याचे तिकीट कापायचे, त्याचे तिकीट कापायचे, याला पाडण्यासाठी प्रयत्न करायचे, त्याला पाडण्यासाठी प्रयत्न करायचे, असे तिथे होऊ नये, अशी बोचरी टीका खडसे यांनी फडणवीस यांच्यावर केली होती.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं होत की, मी अद्यापही संयम बाळगून आहे. घरची धुणी मी रस्त्यांवर कधीच धुत नाही. एकनाथ खडसे हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी टीका, टीप्पणी करणार नाही. परंतु, ते ज्या मनीष भंगाळे प्रकरणावरुन बोलतात त्याबाबत मी एक नक्की सांगतो की, खडसे यांना त्या प्रकरणावरुन राजीनामा द्यावा लागला नाही.