कोरोना व्हायरसचा महाराष्ट्र राज्यावरील वाढता विळखा पाहता आता प्रशासनाकडून कडक पाऊलं उचलण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान राज्य सरकार कडून गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सारी धार्मिक स्थळं बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आता शिर्डीतील साईबाबा मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज (17 मार्च) दिवशी दुपारी 3 वाजल्यापासून मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच शेगाव येथील गजानन महाराज यांचा मठ बंद करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून 31 मार्च पर्यंत बुलढाणा येथील मंदिर बंद असेल. दरम्यान या आधीच प्रभादेवी येथी श्रीसिद्धिविनायक मंदिर, पुण्याचे दगडूशेठ मंदिर तसेच तुळजापूर मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. आजपासून कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील भाविकांना प्रवेश रोखला जाऊ शकतो. लवकरच त्याबबतही निर्णय जाहीर केला जाणार आहे. मुंबई: 'कोरोना व्हायरस'च्या भीतीने श्री सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद; वैद्यकीय मदत कक्ष मात्र सुरु राहणार.
दरम्यान आज सकाळपर्यंत शिर्डीच्या साई मंदिरात भाविकांना आरतीला उपस्थित राहण्यासाठी देण्यात येणारे पास बंद करण्यात आले होते परंतू दर्शनासाठी दिले जाणारे पास सुरू ठेवत मंदीर भाविकांना खुलेच राहणार होते. परंतू आता आज दुपारी 3 वाजल्यापासून साई मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान सध्या महाराष्ट्रात 39 कोरोनाचे रूग्ण असून त्यापैकी मुंबई शहरात एका ज्येष्ठ नागरिकाचा कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अधिक चोख व्यवस्था करण्याला सरकार प्रयत्न करत आहे. यादृष्टीने सध्या मुंबई, पुणे, नागपूर शहरात कलम 144 लागू करत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळा अशी वारंवार विनंती करण्यात येत आहे.