Arnab Goswami | (Photo Credits: ANI)

वास्तुविषारद अन्वय नाईक (Anvay Naik) आत्महत्येप्रकरणी सुरु असलेल्या तपासात अटक झाल्यावर रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असताना अर्णब गोस्वामी यांच्याशी जवळीक करुन त्यांना मोबाईल फोन उपलब्ध करुन देणे दोघांना चांगलेच महागात पडले असून या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे दोघेही अलिबाग कारागृहातील (Alibag Jail) कर्मचारी आहेत. अनंत भेरे (सुभेदार) आणि सचिन वाडे (शिपाई) अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अर्णबला मोबाईल फोन कसा उपलब्ध झाला याचा तपास केल्यानंतर या दोघांची नावे पुढे आली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

न्यायालयाच्या आदेशानुसार अर्णब गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र, कोरोना व्हायरस संसर्गाच्या भीतीमुळे त्यांना अलिबाग येथील मराठी शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. या शाळेत तात्पुरत्या स्वरुपात तुरुगसेवा तयार करण्यात आली होती. मात्र, कारागृह नियमांचे उल्लंघन करत अर्णब गोस्वामी मोबाईल वापरत असल्याची तक्रार रायगड पोलिसांनी केली. त्यानंतर पुढील कारवाई करत अर्णब गोस्वामी यांना सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा येथील कारागृहात दाखल करण्यात आले. (हेही वाचा, Anvay Naik Suicide Case: बॉम्बे हायकोर्टाकडून अंतरिम जामिन मिळण्यासाठी Arnab Goswami यांची सुप्रीम कोर्टात धाव)

कारागृहात मोबाईलवापर प्रकरणी तपास सुरु होता. या तपासात अर्णब आणि इतरही काही आोरपींनी मोबाईल वापर केल्याचे पुढे आले. त्यामुळे इतर आरोपींकडेही कसून चौकशी करण्यात आली. या तपासात कारागृहातील दोन पोलीस कारागृहातील आरोपींना मोबाईल उपलब्ध करुन देत असल्याचे पुढे आले. दरम्यान, हायकोर्टाने जामीन नाकारल्यानंतर अर्नब गोस्वामी यांनी आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावर आज सकाळी 10.30 वाजता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश धनंजय वाय चंद्रचूड आणि न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार.