Anvay Naik Suicide Case: त्या वेळी किरीट सोमय्या यांची बोबडी वळली होती का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आरोपांवर अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांचे प्रत्युत्तर
Anvay Naik Suicide Case |(Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि अन्वय नाईक (Anvay Naik) कुटुंबीयांच्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारांवरुन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेला दावा आणि आरोप या बाबत नाईक कुटुंबीयांनी खुलासा केला आहे. किरीट सोमय्या हे ज्या जमीनीबाबत बोलत आहेत ती जागा त्यांनी खरेदी केली आहे. आम्ही ती दिली आहे. यात गुपीत असे काहीच नाही, असे अन्वय नाईक यांच्या कन्या अज्ञा नाईक (Adnya Naik) यांनी म्हटले आहे. दरम्यान, आम्ही अन्वय नाईक यांना अग्नी दिला तेव्हा किरीट सोमय्या कोठे होते. तेव्हा त्यांची बोबडी वळली होती का? तुम्ही गुन्हेगार अर्णब गोस्वामी याला पाठिशी का घालत आहात असा सवालही अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक (Akshata Naik) यांनी उपस्थित केला आहे.

अज्ञा नाईक यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, जमीन व्यवहाराची सर्व कागदपत्रे खुली असतात. त्यात गुपीत असे कहीही नाही. ही सर्व कागदपत्रे महाभूमीच्या वेबसाईटवर आपल्यालाही पाहायला मिळतील. त्यामुळे खुली असलेली कागदपत्रे जाहीर केल्याबद्दल किरीट सोमय्या यांचे आभार, असे म्हणत अज्ञा नाईक यांनी टोलाही लगावला आहे. (हेही वाचा, Sanjay Raut on Kirit Somaiya: 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर'; अन्वय नाईक यांच्यावरुन ठाकरे कुटुंबियांवर किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर)

अज्ञा नाईक यांनी पुढे बोलताना सांगितले की, किरीट सोमय्या यांनी संबंधीत जमीन खरेदी व्यवहाराबाबत काही भाष्य केल्याचे मला काही लोकांन सांगितले. मी त्याबबतचा व्हिडिओही पाहिला. परंतू, त्या सातबारा उतारे, आणि कागदपत्रांमध्ये गुपीत असे काहीच नाही. किरीट सोमय्या यांना काही मदत हवी असेल तर कधीही बोलवावे. मी स्वत: हजर होईल, असेही अज्ञा नाईक यांनी म्हटले. जमीन कोणी खरेदीच करु शकत नाही का? हा जर योग्य पद्धतीने झालेला व्यवहार आहे तर मग सोमय्या यांना त्यात आताच का समस्या जाणवत आहेत, असा सवालही अज्ञा नाईक यांनी विचारला आहे.

दरम्यान, अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि अज्ञा नाईक यांच्या आई अक्षता नाईक यांनीही किटीट सोमय्या यांच्यावर तीव्र शब्दांमध्ये हल्ला चढवला आहे. आम्ही जेव्हा 5 मे 2018 या दिवशी अन्वय नाईक यांना अग्नी दिला तेव्हा किरीट सोमय्या कुठे होते? त्या वेळी किरीट सोमय्या यांची बोबडी वळली होती काय? त्यांना जर राजकारणच आणायचे असेल तर ते काहीही मुद्दे आणू शकतात. परंतू तुम्ही गुन्हेगार अर्णब गोस्वामी याला का पाठीशी घालत आहात? असाही सवाल अक्षता नाईक यांनी विचारला आहे.