Representational Image (Photo Credits: ANI)

आंध्रप्रदेश मधील दिशा कायद्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा बलात्कारी गुन्हेगारांसाठी कठोर कायदा करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगितले जातेय, मात्र याच वेळी राज्यात बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्याने खरोखरच महिला सुरक्षेसाठी काही केले जातेय का असा सवाल उपस्थित होत आहे. अलीकडेच राज्यातील अकोले (Akole) येथे एका आदिवासी मुलीची बलात्कार (Rape) करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. ही पीडिता शेळ्या मेंढ्या घेऊन माळरानावर गेली असता, या गुन्हेगाराला यातील एक बोकड चोरण्याचा मोह झाला, मात्र बोकड चोरण्यासाठी गेला असता त्याची नजर या मुलीवर पडली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. इतक्यावर तो थांबला नाही तर या मुलीने आपल्याबद्दल कुठेही वाच्यता करू नये यासाठी त्याने तिला जीवानिशी मारून टाकले. घटनेच्या आठ दिवसानंतर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार, कुख्यात गुन्हेगार सोमनाथ गायकवाड असे या बलात्काराचे नाव आहे. त्याचे वय 37 वर्ष आहे. शनिवारी 7  मार्च रोजी दुपारी खानापूर परिसरात गायकवाड एका मित्रासोबत गेला होता. दरम्यान, त्याला बोकड चोरायचा होता, त्यामुळे त्याने बोकड चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरम्यानच्या काळात त्याची नजर फिरली आणि पीडित महिला नराधमाची शिकार झाली.या घटनेचा मागोवा करत असताना पोलीसांनी गायकवाड याच्या विरुद्ध पुरावे हस्तगत करून त्याला अटक केली आहे. नागपूर: बलात्कारामुळे गरोदर राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा प्रसूतीनंतर मृत्यू

दरम्यान, या प्रकरणात गायकवाड याचा आणखीन एक मित्र सुद्धा सामील असल्याची पोलिसांनी शंका आहे. यावरून सध्या पोलिसांची एक खास टीम सखोल तपास करत असून लवकरच यातील गुन्हेगारांना ताब्यात घेऊ असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटावर उपाय शोधल्यावर मग बलात्कार विरोधी कायद्याच्या निर्मितीचे निर्णय घेतले जातील अशी माहिती काही दिवसांपूर्वीमहाराष्ट्र राज्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.