शरद पवार आणि अजित पवार (Photo Credits-Facebook)

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु बहुमताचा आकडा सिद्ध न करता आल्यामुळे, ते सरकार 80 तासांतच कोसळलं. अजित पवार यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा राष्ट्रवादीकडे वाटचाल केली. काल त्यांनी स्वतः जाऊन रात्री शरद पवार यांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

अजित पवारांची घर वापसी होताच, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल ट्रायडंट हॉटेलच्या बाहेर 'एकच वादा अजित दादा' असे बॅनर्स घेऊन शक्तिप्रदर्शन केलं. त्याचसोबत अनेक राष्ट्रवादीच्या आमदारांना अजित पवार हेच उपमुख्यमंत्री व्हावेत असं ही वाटत आहे.

अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना एक मोठा खुलासा देखील केला आहे. ते म्हणाले की, "मी बंड केलंच नव्हतं. माझी राष्ट्रवादी काँग्रेसने हकालपट्टी केली नव्हती. मी तेव्हाही राष्ट्रवादीत होतो आणि आताही राष्ट्रवादीतच आहे."

तसेच मुख्यमंत्री पद जरी उद्धव ठाकरे यांना मिळालं असलं तरी उपमुख्यमंत्री पद मात्र काँग्रेस अन राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना विभागून देण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातून अजित पवार उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का हे बघणं महत्त्वाचं ठरेल.

उद्धव ठाकरे यांचा शपथविधी असणार ग्रँड; पाहा काय करण्यात आली आहे विशेष तयारी

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा उद्या ग्रँड सोहळा आयोजित करण्यात आला असून तो शिवतीर्थावर पार पडणार आहे.