Uddhav Thackeray | (Photo Courtesy: facebook / ShivSena)

अखेर महाराष्ट्र राज्यात सत्तेचा तिढा सुटला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण महाराष्ट्र विकास आघाडीने सत्तेचा दावा केला आहे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. उद्या (गुरुवार 28 नोव्हेंबर) उद्धव ठाकरे यांचा शपथविधी (Uddhav Thackeray Oath Ceremony) होणार असून तो ग्रँड पद्धतीने करायचा असं ठरवण्यात आलं आहे.

मुंबईत शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्क येथे हा शपथविधी उद्या संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर पार पडणार आहे. शिवसेनेचे आजवर सर्व महत्त्वाच्या सभा व मेळावे हे शिवतीर्थावरच पार पडले आहेत. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज हा इथेच घुमला होतं त्यामुळेच ही जागा शपथविधीसाठी ठरवण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्कच्या मैदानावर सहा हजार चौरस फुटांवर भव्य व्यासपीठ उभारलं जात आहे. तसेच टीव्ही 9 या वृत्तवाहिनी ने दिलेल्या माहितीनुसार, शपथविधीचा मंच इतका भव्य असणार आहे की  शंभर जणांना बसण्यासाठी आसन व्यवस्था तिथे असेल. तसेच हा शपथविधी पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी 60 हजार खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे.

या शपथविधी सोहळ्यादरम्यान शिवाजी पार्कच्या कानाकोपऱ्यात 20 एलईडी लावले जाणार आहेत. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीला सजवण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्री; एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह या दिग्गज चेहऱ्यांना मिळू शकते संधी

कोणाला निमंत्रण?

उद्धव ठाकरे यांचे बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शपथविधीला उपथित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु भाजपकडून कोण उपस्थित राहील हे मात्र अद्याप निश्चित नाही. तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित राहू शकतात.