राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निवास्थान सिल्वर ओक (Silver Oak) येथे दाखल झाले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात बंड केल्यानंतर शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेऊन आजच त्यांनी राज्याचे अर्थमंत्रीपद मिळाले. अर्थमंत्री पदाचा कार्यभार दुपारी स्वीकारल्यानंतर सायंकाळनंतर ते थेट सिल्वर ओक येथे दाखल झाले आहेत. अजित पवार हे तातडीने मोठ्या पवारांच्या निवास्थानी गेल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. राजकीय वर्तुळात या प्रसंगाची उलटसुलट चर्चा सुरु आहे.
शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आपल्या काकींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवार हे सिल्वर ओकला दाखल झाले असावेत असे बोलले जात आहे. दरम्यान, शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे या सिल्वर ओकवर उपस्थित आहेत किंवा नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. तसेच अजित पवार यांच्या या भेटीमागे काही राजकीय भूमिका आहे का? याबाबतही पुरेसी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. (हेही वाचा, Pratibha Pawar: प्रतिभा पवार यांची प्रकृती बिघडली, मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल)
अजित पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात पाठिमागील काही दिवसांपासून विशेष चर्चेत आहे. या नावाने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. आजवर देशाला शरद पवार हे नाव माहिती होते. शरद पवार हे सत्तेत असो किंवा नसो आपल्या खास शैलीने आणि राजकीय कामगिरीने अवघ्या देशाच्या नक्कीच केंद्रस्थानी असतात. मात्र, आपल्या राजकीय आयुष्यात अनेकांना कात्रजचा घाट दाखवणाऱ्या शरद पवार यांना भाजपने त्यांचा पुतण्या अजित पवार यांच्या रुपातच धक्का दिल्याने या घटनेकडे विशेष नजरेने पाहिले जात आहे. या घटनेमुळेही अजित पवार सध्या देशभर चर्चेत आहेत.