प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : youtube)

सध्या महाराष्ट्रात फक्त मुंबई, पुणे आणि नागपूर ही तीनच ठिकाणे हवाई मार्गाद्वारे व्यवस्थित जोडली गेलेली आहेत. महाराष्ट्रातीत इतर महत्वाची शहरे, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव इत्यादी अजूनही फक्त बस आणि रेल्वे याच मार्गांनी जोडलेली असताना, एअर डेक्कन या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीने महाराष्ट्रात कोल्हापूर, जळगाव व नाशिक या नियमित विमानसेवा नसलेल्या शहरांना हवाईमार्गे जोडले होते. यामुळेच 5 तासांवरील प्रवास हा फक्त काही मिनिटांत होणे शक्य झाले होते. मात्र या मार्गावर नियमित सेवा सुरू न ठेवल्याबद्दल या कंपनीचा परवानाच रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता एअर डेक्कन कंपनीची महाराष्ट्रातील सेवा पूर्णपणे बंद झाली आहे.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा ‘उडान’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी एएआय ही देश पातळीवरील नोडल संस्था नियुक्त करण्यात आली आहे. एअर डेक्कनने एएआयकडून परवाना घेऊन महाराष्ट्रातात काही महत्वाच्या शहरांमध्ये विमानसेवा पुरवण्यास सुरुवात केली होती. एअर डेक्कनच्या सेवेसाठी संबंधित तिन्ही विमानतळांवर एमएडीसीने कोट्यवधी खर्चून अनेक सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. हे सर्व केल्यानंतरही एअर डेक्कनची सेवा नियमित नव्हती. अनेकदा कंपनीकडून ही उड्डाणे अचानक रद्द केली जात होती. उड्डाणांचे वेळापत्रक व्यवस्थित पाळले जात नव्हते. यामुळे एमएडीसीने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार आता एएआयने एअर डेक्कनचा परवाना रद्द केला आहे.

भोंगळ कारभार आणि अव्यावसायिक पद्धतीची सेवा देणारी कंपनी असा लोकिक झाल्यानंतर, या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार ऑगस्टपासून दिले नसल्याची बाबही समोर आली आहे. याचसोबत कंपनीने त्यांचे विमान ओझरच्या धावपट्टीवर पार्क केले होते, त्याचे भाडे आणि एका प्रतिष्ठित हॉटेलचे कर्मचाऱ्यांचे तब्बल 7 लाखांचे भाडेही थकवले आहे.