![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/03/coronavirus-1-380x214.jpg)
महाराष्ट्रातील अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील (Jawahar Navodaya Vidyalaya) कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमितांची संख्या 51 वर गेली आहे. यामध्ये तब्बल 48 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आरोग्य अधिकाऱ्याने रविवारी याबाबत माहिती दिली. या शाळेत 5 वी ते 12 वी पर्यंत 400 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. पारनेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी पीटीआयला सांगितले की, सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी सदस्यांच्या आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या.
यामध्ये आतापर्यंत, जवाहर नवोदय विद्यालयातील 48 विद्यार्थी आणि तीन कर्मचारी सदस्यांसह 51 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या सर्वांना विलग करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतेक विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवोदय विद्यालय नेटवर्कचा भाग असलेली ही शाळा अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर गावात आहे.
#Update | 48 students & 3 staff of Jawahar Navodaya Vidyalaya in Takli Dhokeshwar, Ahmednagar found positive for COVID-19 till now: Ahmednagar District Magistrate Rajendra Bhosale#Maharashtra
— ANI (@ANI) December 26, 2021
सुरुवातीला काही विद्यार्थ्यांनाच सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे शाळेने त्यांचीच तपासणी करण्याचा निर्णय घेतला मात्र, एकेकाची तपासणी करता करता कोरोना संक्रमितांची संख्या वाढत गेली. त्यामुळे शाळा प्रशासनालाही धक्का बसला आहे. तीन दिवसांपूर्वी या विद्यालयात 16 विद्यार्थी, दोन शिक्षक, सफाई कर्मचारी, असे 19 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले होते. त्यानंतर संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, काल महाराष्ट्रामध्ये 1485 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली असून, 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 6656240 रुग्ण आढळले असून, सध्या 9102 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.