
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 12 एप्रिलला रायगड दौर्यावर येणार आहेत. गृहमंत्र्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर 12 एप्रिल रोजी मुंबई - गोवा महामार्गावरील खारपाडा ते कशेडीपर्यंतचा रस्ता हा अवजड वाहनांसाठी बंद ठेवला जाणार आहे. 12 एप्रिल रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 345 वी पुण्यतिथी आहे. तिथी नुसार शिवरायांच्या या पुण्यतिथीला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
अनेक शिवभक्त रायगडावर कार्यक्रमाला येणार आहेत. यावेळी अपघात आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडी पर्यत जड-अवजड वाहनाना बंदी घालण्यात आली आहे. नक्की वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणार्यांना आता कायदा रोखणार; 12 एप्रिलला अमित शाह रायगडावरून घोषणा करणार?
मुंबई गोवा महामार्गावर कोणाला निर्बंध
12 एप्रिल 2025 दिवशी मध्यरात्री 1 ते दुपारी 3 वाजेपर्यत मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा ते कशेडी पर्यत जड-अवजड वाहनांच्या वाहतूकीला बंदी असणार आहे.
दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलिस वाहने, फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहिका, तसेच महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी येणारी वाहने यांना मात्र या निर्बंधांमधून सुटका मिळणार आहे.
खासदार सुनिल तटकरे यांच्या घरी देणार भेट
रायगड दौर्यावर असताना किल्ले रायगडावरील कार्यक्रमानंतर अमित शाह यांना एनसीपी खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे सुतारवाडीला आमंत्रण आहे. अमित शाह यांनीही हे आमंत्रण स्वीकारले आहे.