
Sanjay Raut on Lockdown: शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात लॉकडाऊनसंदर्भात (Lockdown) भाष्य केलं आहे. तसेच राऊत यांनी लॉकडाऊन विरोधात असलेले केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या भाजप नेत्यांना फटकारले आहे. संजय राऊत यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं आहे की, कोरोनाबरोबरचे युद्ध हे भारत-पाक युद्ध नाही. कोरोनाविरूद्धच्या युद्धावर कोणीही राजकारण करू नये. संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. परंतु, बंगालमध्ये निवडणुका झाल्यानंतर केंद्र सरकार लॉकडाऊनबाबत निर्णय घेईल, अशी खोचक टीकादेखील यावेळी संजय राऊत यांनी केली आहे.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते म्हणतात की लोकांना लॉकडाउन नको आहे. होय, हे आम्हालादेखील माहित आहे. परंतु, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आणखी कोणता मार्ग आहे का? असा सवालही यावेळी राऊत यांनी केला आहे. (वाचा -रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांचे प्रत्युत्तर)
संजय राऊत यांनी यावेळी केंद्रातील भाजप नेत्यांवरदेखील टीकास्त्र डागलं. लॉकडाऊन संदर्भात बोलताना राऊत पुढे म्हणाले, 'प्रकाश जावडेकरांनी दिल्लीत बसून आम्हाला व्याख्यान देऊ नये. त्यांनी महाराष्ट्रात येऊन परिस्थिती पाहिली पाहिजे. त्याचे या राज्याशी नाते आहे. कोरोना मुद्दयावरून कुणीही राजकारण करू नये.' (वाचा - Maharashtra Lockdown Update: महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज टास्क फोर्ससोबत बैठक घेणार; लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता)
दरम्यान, लॉकडाऊन जगभरात मान्य असल्याचे सांगत संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन व्यतिरिक्त कोणताही पर्याय नसल्याचं म्हटलं. मात्र, याचा अर्थ असा नाही की, केवळ महाराष्ट्रातचं अशी परिस्थिती आहे. कोरोना विषाणू देशभरात झपाट्याने पसरत आहे. देशात लॉकडाउन होईल की, नाही हे फक्त पंतप्रधानचं ठरवू शकतात, परंतु, पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या निवडणूक रॅली संपल्यावरचं केंद्र सरकार यावर निर्णय घेईल, असा चिमटाही यावेळी संजय राऊत यांनी काढला.