अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या प्रवर्तित आणि नियंत्रणाखालील कंपनीची 6.25 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. त्यानंतर बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केंद्रीय तपास यंत्रणा तैनात करून राज्य सरकार आणि नेत्यांना लक्ष्य करण्याच्या भाजपशी दोन हात करण्याचा एकमताने निर्णय घेतला. कालच्या ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली नव्हती, त्यानंतर आज त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सांगितले की, ‘आम्ही एकत्र लढू.’
केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या इशार्यावर ईडीने ही कारवाई केल्याचा दावा करत, राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी ईडीच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला होता. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कॅबिनेट मंत्र्यांनी असा दावा केला की, भाजप महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यासाठी ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्ससह केंद्रीय तपास यंत्रणांना कारवाई करण्यास सांगत आहे.
एमव्हीएच्या एका वरिष्ठ मंत्र्याने फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, ‘कालच्या ईडीच्या कारवाईने पुन्हा सिद्ध झाले आहे की भाजप एमव्हीए नेत्यांना स्कॅनरखाली ठेवत आणि कारण त्यांचे सरकार पडण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. राज्यातील मंत्र्यांनी सूडाच्या राजकारणाबाबत भाजपवर टीका केल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत म्हटले की, केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईने आपण खचून जाऊ नये, तर एकत्रितपणे त्याचा मुकाबला करू आणि सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना तोंड देऊ.’ (हेही वाचा: Aditya Thackeray On Shridhar Patankar: श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडी कारवाई प्रकरणी आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया)
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि त्यांच्या पत्नी रश्मी यांचे बंधू असलेल्या श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई करत ईडीने ठाणे येथील त्यांच्या 11 सदनिका जप्त केल्या. या सदनिका श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीच्या आहेत. ही कंपनी श्रीधर पाटणकर यांची आहे. जप्त करण्या आलेल्या मालमत्तांची एकूण किंमत अंदाजे 6 कोटी 45 लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.