Aditya Thackeray On Shridhar Patankar: श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडी कारवाई प्रकरणी आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
Aaditya Thackeray | (Photo Credit: ANI/Twitter)

श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने (ED) केलेल्या कारवाईवरुन राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. श्रीधर पाटणकर यांचा राज्याच्या राजकारणाशी थेट संबंध नाही. असे असले तरी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे सख्खे बंधू आहेत. त्यामुळे सहाजिकच राज्याच्या राजकारणात या कारवाईचे पडसाद उमटणे स्वाभाविक होते. त्यानुसार महाविकासआघाडी सरकारमधील आणि विरोधी पक्षांनीही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आणि पाटणकर यांचे भाचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray On Shridhar Patankar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता आदित्य ठाकरे यांनी अत्यंत माफक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. आज दिवशभर मी विधिमंडळ सभागृहात होतो. त्यामुळे मला कारवाईबाबत काहीही माहिती नाही. मी आगोदर याबाबत माहिती घेतो आणि त्यानंतर आपल्याशी सविस्तर बोलतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. दरम्यान, महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य करण्यासाठी ही कारवाई होते आहे का? असे प्रसारमाध्यमांनी विचारले. याबोलताना 'आपण हे जी माहिती देत आहात त्यावरुन हे जाणीवपूर्वकच केले जाते आहे हे समजून जा' असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. (हेही वाचा, Sharad Pawar on ED: राजकीय स्वार्थासाठी केंद्रीय एजन्सीचा गैरवापर- शरद पवार)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि त्यांच्या पत्नी रश्मी यांचे बंधू असलेल्या श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई करत ईडीने ठाणे येथील त्यांच्या 11 सदनिका जप्त केल्या. या सदनिका श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीच्या आहेत. ही कंपनी श्रीधर पाटणकर यांची आहे. जप्त करण्या आलेल्या मालमत्तांची एकूण किंमत अंदाजे 6 कोटी 45 लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.