Sharad Pawar on ED: राजकीय स्वार्थासाठी केंद्रीय एजन्सीचा गैरवापर- शरद पवार
NCP Chief Sharad Pawar (Photo Credits: ANI)

राजकीय स्वार्थासाठी केंद्रीय एजन्सीचा गैरवापर केला जात आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत बहुतेक लोकांना ईडीची माहिती नव्हती, परंतु आज त्याचा इतका गैरवापर केला जात आहे की खेड्यापाड्यातील लोकांनाही याची माहिती आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. श्रीधर माधव पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू आहेत.

श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंर महाविकासआघाडी सरकारकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही सुडाने केलेली कारवाई असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा हुकुमशाहाच्या गुलामांप्रमाणे वागत आहेत. ही देशाला हुकुमशाहीच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. काही झाले तरी त्याचा महाविकासआघाडी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव टाकून आम्ही तुम्हाला झुकवू शकतो, असे दाखवण्याचा प्रकार म्हणजे ही कारवाई आहे. त्यांना जसे वाटते तसे काहीही घडणार नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Sanjay Raut on ED: 'केंद्रीय तपास यंत्रणा हुकुमशाहाच्या गुलामांप्रमाणे वागत आहेत', श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईवर शिवसेना खसादर संजय राऊत)

काय आहे प्रकरण?

अंमलबजावणी संचालनालय अर्थातच इडीने आज पुष्पक ग्रुपवर मोठी कारवाई केली. ज्याचा संबंध मुख्यमंत्र्यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्याशी लावला जातो आहे. ईडीने आज ठाण्यातील निलांबरी अपार्टमेंट्स येथील 11 सदनिका जप्त केल्या. या सदनिका श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. ईडीचे म्हणने असे की, जप्त करण्यात आलेल्या सदनिकांची किंमत सुमारे 6.45 कोटी रुपयांच्या घरात आहेत. या प्रकरणात पहिला गुन्हा 2017 मध्ये नोंदविण्यात आला होता. हा गुन्हा मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित होता. या प्रकरणात या आधाही ईडीने पुष्पक बुलियनची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. आता पुन्हा कारवाई करत आणखी काही संपत्ती ईडीने जप्त केली आहे.

आरोप आहे की, श्री साईबाबा गृहनिर्मीती समिती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून 30 कोटी रुपयांचे असुरक्षीत कर्ज घेण्यात आले. हे कर्ज नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या एका व्यक्तीच्या माध्यमातून घेण्यात आले. हा चतुर्वेदी हा इसम एक एंट्री ऑपरेटर असल्याचे सांगितले जात आहे. या ऑपरेटर्सच्या माध्यमातून मिळालेल्या पैशातूनच पाटणकर यांनी ठाण्यात 11 सदनिका खरेदी केल्याचा आरोप आहे. मनी लॉन्ड्रींगमधील पैसा हा या सदनिका खरेदी करण्यासाठी वापरण्यात आला असावा असा संशय ईडीला आहे.