Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने केलेली कारवाई म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत काढलेला सूड आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. श्रीधर पाटणकर यांच्यावरील इडीच्या कारवाईनंतर शिवसेनेच्या वतीने आलेली ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या हुकुमशाहाच्या गुलामाप्रमाणे वागत आहेत. काही झाले तरी त्याचा महाविकासआघाडी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव टाकून आम्ही तुम्हाला झुकवू शकतो, असे दाखवण्याचा प्रकार म्हणजे ही कारवाई आहे. त्यांना जसे वाटते तसे काहीही घडणार नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून सुरु असलेल्या कारवाया म्हणजे देशातील हुकुमशाहीची सुरुवात आहे. भाजपला चार राज्ये जिंकली म्हणून आपण देशाचे मालक झालो असे वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. आम्ही आझादीची लढाई पुन्हा लढण्यास तयार आहोत. आम्ही परिणामांना घाबरत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Sridhar Patankar: रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या 11 सदनिका इडीकडून जप्त)

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय विभागाने म्हणजेच ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. श्रीधर पाटणकर यांच्या ठाणे येथील निलांबरी प्रोजेक्टमधील 11 सदनिका इडीने जप्त केल्या आहेत. ईडीने पुष्पक ग्रुपची 6 कोटी 45 लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. पुष्पक ग्रुपवर कारवाई करतानाच पाटणकर यांच्याही काही सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत, असे वृत्त आहे.