Sridhar Patankar:  रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या 11 सदनिका इडीकडून जप्त
Sridhar Patankar | (File Image)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय विभागाने म्हणजेच ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. श्रीधर पाटणकर यांच्या ठाणे येथील निलांबरी प्रोजेक्टमधील 11 सदनिका इडीने जप्त केल्या आहेत. ईडीने पुष्पक ग्रुपची 6 कोटी 45 लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. पुष्पक ग्रुपवर कारवाई करतानाच पाटणकर यांच्याही काही सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत, असे वृत्त आहे.

प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण पुष्पक बुलियन कंपनीशी संबंधित आहे. या प्रकरणात सुरु असलेल्या कारवाईत आतापर्यंत 6.45 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या कारवाईतच ठाण्यातील नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. ही कंपनी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे .

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचा अर्थ या कारवाईनंतर काढला जातो आहे. हे प्रकरण 2017 मध्ये सुरु झाले आहे. मध्ये पुष्पक बुलियन्स या कंपनीविरोधात ईडीने 2017 मध्ये गुन्हा नोंदवला होता. हा गुन्हा मनी लॉंडरींगचा होता. ईडीने आतापर्यंत केलेल्या कारवाईत पुष्पक बुलियन्सची 21 कोटी रुपयांची संपत्ती यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही संपत्ती महेश पटेल आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती, असे सांगितले जात आहे.