Lok Sabha Elections 2024: अभिनेता गोविंदा शिवसेनेच्या 'धनुष्यबण' तर स्वरा भास्कर आणि राज बब्बर काँग्रेसच्या 'पंजा'वर लढणार निवणूक? राजकीय वर्तुळात चर्चा
Swara Bhaskar, Raj Babbar, Govinda | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अभिनेता गोविंदा (Govinda) हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा आहेत. तर दुसऱ्या बाजूला अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) आणि राज बब्बर (Raj Babbar) हे काँग्रेस पक्षाकडून पंजा चिन्हावर मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. या चर्चांमध्ये तथ्य किती हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक 2024 जाहीर झाल्यापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये सर्वपरिचीत आणि सक्षम उमेदवार देण्यावर राजकीय पक्ष जोर देत आहेत. अशा वेळी काही मतदारसंघांमध्ये राजकीय नेता, कार्यकर्ता यांच्याऐवजी चक्क सेलिब्रेटी मंडळींनाच मैदानात उतरविण्याचा घाट घातला जातो आहे.

अमोल कीर्तिकर विरुद्ध गोविंदा?

राजकीय वर्तुळातील चर्चा आणि सूत्रांनी दिलेली माहिती यांनुसार, अभिनेता गोविंदा मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांच्या ऐवजी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गोविंदा याला उमेदवारी द्यावी, अशी शिंदेच्या सेनेत चर्चा आहे. या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. अशा वेळी गोविंदा याच्या रुपात एक तगडा उमेदवार दिल्यास लढत प्रमाणबद्ध होईल, असा अनेकांचा व्होरा आहे. अर्थात याबाबत शिंदे गटातून अद्याप अधिकृत वक्तव्य आले नाही. (हेही वाचा, Ajit Pawar On Nana Patekar: 'ना ना' म्हणत नाना पाटेकर यांचा अजित पवार यांना नकार; राष्ट्रवादीतर्फे शिरुरसाठी होता उमेदवारी प्रस्ताव)

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून सेलिब्रेटी?

दुसऱ्या बाजूला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून अभिनेता राज बब्बर किंवा स्वरा भास्कर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज बब्बर हे प्रदीर्घ काळापासून काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. मात्र, स्वरा भास्कर यांचे नाव नवीन आहे. अलिकडेच त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची दिल्ली येथे भेट घेतल्याचे समजते. अर्थात, निवडणुकीच्या हंगामात अनेक सेलिब्रेटींची नावे चर्चेत येतात. राजकीय पक्षांकडून प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर होते तेव्हा मात्र यातील बहुतांश नावे मागे पडलेली असतात. त्यामुळे अजून तरी या चर्चांना दुजोरा मिळू शकला नाही. (हेही वाचा, खासदार नवनीत राणा यांचा गोविंदासोबत 'चलो इश्क लडाए सनम' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल (Watch Video))

अभिषेक बच्चनही मैदानात?

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातूनही एखादा सदस्य निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. जया बच्चन या आगोदरच राज्यसभेच्या खासदार आहेत. आता त्यांचे चिरंजीव अभिषेक बच्चन हे सुद्धा राजकारणात पदार्पण करणार असल्याचे समजते. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षातर्फे त्यांना खजुराहो येथून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याचे सांगिले जात आहे. अर्थात या चर्चेलाही समाजवादी पक्ष अधवा दस्तुरखुद्द बच्चन कुटुंबीयांपैकी कोणत्याही सदस्याकडून अद्यापपावेतो दुजोरा मिळाला नाही.