
Shiv Sena vs Samajwadi Party: समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी 'औरंगजेब हा क्रूर राजा नव्हता' (Abu Azmi Aurangzeb Remark) असे उद्गार काढल्याने नवा वाद उद्भवला आहे. अब आझमी यांनी केलेल्या वक्तव्यावर सर्वपक्षीयांनी आक्षेप घेतला असून तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आझमी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी माफी मागावी, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दुसऱ्या बाजूला विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे ही सपा आमदारांच्या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के हे आझमी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आझमी यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे.
अबू आझमी यांचे वक्तव्य काय?
समाजवादी पक्षाचे आमदार असलेल्या अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना औरंगजेब बादशाह (Aurangzeb Controversy) याच्याबद्दल अनेक वक्तव्य केली. ज्यावर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आजमी यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष धार्मिक नव्हता. ते राजकीय युद्ध होते. त्यांच्यात राज्य कारभाराची लढाई होती. 'छावा' चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. खरे तर औरंगजेबाने अनेक मंदिरे उभारली त्याच्या काळात भारताच्या सीमा अफगाणिस्तानपर्यंत विस्तारली होती. तसेच, त्या काळातला जीडीपी 24 टक्के इतका होता. तो भारताचा सर्वात उत्तम काळ होता. त्या काळात भारताला सोने की चिडिया म्हटलं जात असे, आता या सगळ्याला मी चुकीचं म्हणून का? औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील लढाईसुद्धा धर्माची होती असे मी मानत नसल्याचे आझमी यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Samajwadi Party BJP's 'B Team': महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष म्हणजे भाजपची 'बी टीम'; Aaditya Thackeray यांची अबू आजमी यांच्यावर टीका)
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
आजमी यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र आक्षेप घेत टीका केली आहे. त्यांचे वक्तव्य अस्वीकार्य आणि निषेधार्ह आहे. औरंगजेबला चांगला प्रशासक म्हणणे हे पाप आहे. हा तोच औरंगजेब आहे ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस छळले. अबू आझमींनी ताबडतोब माफी मागावी. आमच्या मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे आणि राष्ट्रीय नायकांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असे मला वाटते,असेही शिंदे यांनी म्हटले आहे. ते मुंबई येथे बोलत होते. जो कोणी राष्ट्रीय नायकांच्या विरोधात बोलतो त्याला देशद्रोही ठरवले पाहिजे, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Samajwadi Party Will Exit MVA: महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठा धक्का! समाजवादी पार्टी युतीतून बाहेर पडणार; अबू आझमी यांची घोषणा)
आदित्य ठाकरे याच्याकडूनही कारवाईची मागणी
शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांच्याकडूनही आझमी यांच्यावर जोरदार टीका. 'आमचे मुख्यमंत्री त्यांच्याविरुद्ध काय कारवाई करतात ते आम्ही बारकाईने पाहत आहोत' असे ठाकरे म्हणाले.
खासदार नरेश म्हस्के पोलीस स्टेशनमध्ये
दरम्यान, हे वृत्त लिहीत असताना, औरंगजेबावरील विधानाबद्दल महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू असीम आझमी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेना खासदार नरेश म्हस्के वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात पोहोचले होते. खासदार म्हस्के यांनी म्हटले आहे की, अबू आझमी यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करावा. त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही. हजारो हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करणारा, महिलांवर अत्याचार करणारा, छत्रपती संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करणारा औरंगजेब देशविरोधी होता, त्याने आपला देश लुटला.. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी आज सकाळीच मागणी केली आहे की त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करावा. आज आम्ही त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्यासाठी येथे (पोलीस स्टेशन) आलो आहोत.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल
#WATCH | Thane, Maharashtra: Shiv Sena MP Naresh Mhaske arrives at Wagle Estate Police Station to file a case against Maharashtra Samajwadi Party president Abu Asim Azmi over his statement on Aurangzeb
MP Mhaske says, "A sedition case should be filed against Abu Azmi. He has no… pic.twitter.com/cW9qfaSf5l
— ANI (@ANI) March 3, 2025
बॉलिवूड चित्रपट 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्याबासून हा वाद उद्भवला आहे. हा चित्रपट मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक ऐतिहासिक कथानक आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट संभाजीराजे यांच्या राज्याभिषेक, लढाया आणि औरंगजेबाच्या राजवटीविरुद्धच्या प्रतिकारावर प्रकाश टाकतो. या चित्रपटात संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल, येसूबाई भोसलेच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आणि औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहेत.