Aaditya Thackeray (Photo Credits: Facebook)

सांगली जिल्ह्यातील मौजे भोसे येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा 400 वर्ष जुना असलेला वटवृक्ष वाचविण्याबाबत राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पत्र लिहून विनंती केली आहे. याशिवाय आदित्य ठाकरे यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा वटवृक्ष (Banyan Tree) वाचविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन व्यापक कार्य करीत आहे. त्यामुळे वृक्षसंवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. सांगली जिल्ह्यातील संबंधित वटवृक्ष पुरातन असून त्याचे जतन होणे गरजेचे असल्याचे ठाकरे यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - अकोला: आई आलीच नाही! बकरीच्या दूधावर बिबट्याच्या बछड्यांची गुजराण)

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, आपल्या विभागामार्फत रत्नागिरी- कोल्हापूर-मिरज-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 चे काम सुरु आहे. या नियोजित रस्त्याच्या कामामुळे परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

मात्र, मिरज ते पंढरपूर या शहरांच्या दरम्यान हा महामार्ग मोजे भोसे या गावातून जातो. मोजे भोसे गावातील गट क्र. 436 येथे यल्लमा देवीचे पुरातन मंदिर असून या मंदिरासमोरच सुमारे 400 वर्षापूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे. त्याचा विस्तार सुमारे 400 चौ.मी. इतका व्यापक आहे. हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा आहे. तसेच ते वटवाघुळ आणि इतर दुर्मिळ पक्षी यांच्याकरिता नैसर्गिक निवासस्थानही आहे.

त्यामुळे नियोजित राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 च्या कामामुळे या पुरातन वटवृक्षास बाधा पोहोचत असल्याने वटवृक्ष तोडावे लागेल किंवा पर्यायी जागेवरुन रस्ता करावा लागेल असे मिरज उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालात नमूद केलेले आहे. या वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता तसेच परिसरातील पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाचा विचार करता मोजे भोसे येथील संबंधित जागेवरील महामार्गाचे संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचे जतन होण्याबाबत कार्यवाही करावी, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी केली आहे.