शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज (22 जुलै) नाशिक दौऱ्यावर आहेत. येवला येथे ते एक जाहीर सभाही घेणार आहेत. या सभेसाठी पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदारसंघात ही सभा होत असल्याने अधिक उत्सुकता आहे. NCP मध्ये झालेल्या फुटीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पहिली सभा याच ठिकाणी घेतली होती. त्यामुळे महाविकासआघाडीने भुजबळ यांना घेरले आहे काय, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातो आहे.
आदित्य ठाकरे यांचा राजकीय दौरा आणि येवला येथे पार पडणारी जाहीर सभा, याबाबत विचारले असता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. काहीशी नाराजीही व्यक्त केली. ते येत असतील तर आनंद आहे. सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरु आहे. सुट्टी असल्याने कामकाज बंद आहे. त्यातच आगामी काळात निवडणुकाही आहेत. सर्वच पक्ष दौरे आखत आहेत. त्यामुळे तेही फिरत आहेत. अगदी संभाजीनगर पर्यंत जात आहेत. अशाच पद्धतीने ते जर पंधरा वर्षांपूर्वी आले असते तर त्यांना खरा फरक कळला असता, असे ते म्हणाले. (हे वाचा, Uddhav Thackeray ईर्शाळवाडी दौऱ्यावर, ठाणे येथील मेळावाही रद्द)
प्रदीर्घ काळानंतर आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे या दौऱ्यात ते नेमके काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे. या आधी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येवला येथे सभा घेतली होती. पक्षातील फुटीनंतर त्यांनी जाहीररित्या घेतलेली ती पहिलीच सभा होती. या सभेला नागरिकांनी उत्सुफूर्त प्रतिसाद दिला. खास करुन तरुण वर्ग मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते. त्यानंतर काहीच दिवसांमध्ये शिवसेना (UBT) पक्षाची सभा पार पडते आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाकडूनही याच ठिकाणी सभेचे आयोजन केले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर छनग भुजबळ यांना महाविकासआघाडने घेरले आहे काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.