Uddhav Thackeray ईर्शाळवाडी दौऱ्यावर, ठाणे येथील मेळावाही रद्द
Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Irshalwadi Landslide: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात भूस्खलन झालेल्या ईर्शाळवाडी गावाला भेट देणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच तेथे दरड कोसळल्याने अवघे गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत 26 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 105 लो अद्यापही बेपत्ता आहेत. शोधकार्य अद्यापही सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते दुर्घटनाग्रस्तांना भेटत आहेत. त्यांचे सांत्वन करुन आधार देत आहेत. आजच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

ठाणे येथील उत्तर भारतीयांचा मेळावा रद्द

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने ठाणे येथील उत्तर भारतीय नागरिकांचा मेळावा गडकरी रंगायतन येथे आयोजित केला होता. ईर्शाळवाडी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा मेळावाही रद्द करण्यात आला असल्याचे समजते. हा मेळावा 22 जुलै रोजी पार पडणार होता. खासदार विनायक राऊत यांनी यांनी माहिती देताना सांगितले की, हा मेळावा तुर्तास रद्द होत असला तरी पुढच्या आठवड्यात किंवा आगामी काळात पुन्हा आयोजित करण्यात येईल. (हेही वाचा, Irshalwadi Landslide: रायगड मधील इर्शाळवाडी परिसरात NDRF च्या मदतीला श्वानपथक; पहा बचावकार्याची ताजी दृष्य (Watch Video))

दरड कोसळली आणि या गावात होत्याचं नव्हतं झालं

खालापूर तालुक्यातील ईर्शाळवाडी निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगरकपारीत वसलेले अवघ्या 400 ते 500 लोकवस्तीचे हे गाव. मुसळधार पावसाची संततधार सुरु असतानाच रात्रीच्या अंधारात अचानक दरड कोसळली आणि या गावात होत्याचं नव्हतं झालं. गावावर दरड कोसळली. देह धरणीवर टाकून विसावलेल्या बायाबापड्या, लहान मुलं, म्हाताकोतारी माणसं आणि सळसळत्या तारुण्याची युवा पिढीवर अचानक काळानं घाला घातला.

NDRF पथकाकडून अद्यापही शोधमोहीम सुरुच

पीडितांच्या वेदनांचे चित्कार रात्रीचा अंधार कापत होते. मदत आणि बचावासाठी विनंवणी करत होते. मात्र, डोंगर पहाडांशिवाय त्यांचा आवाज ऐकालयाल तिथे कोणीच नव्हते. प्रशासनाला माहिती कळताच पहाटेपासूनच मदत आणि बचाव कार्यास सुरुवात झाली होती. पण डोक्यावर कोसळणारा पाऊस आणि दाट धुक्यामुळे कमी झालेली दृश्यमानता यामुळे मोठे अडथळे येत होते. त्यामुळे त्यात विलंब होत होता. काही तास उलटून गेल्यानंतर NDRF चे या ठिकाणी शोधकार्य अद्यापही सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज ईर्शाळवाडी गावचा दौरा करत आहेत. त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहगे.