जालना येथे मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा राज्यभरतातून निषेध केला जात आहे. राजकीय पक्षांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही या लाठीमारावरुन सरकारवर जोरदार टिका केली आहे. ज्या ठिकाणी लाठीमार झाला त्याच ठिकाणी राज्य सरकार सरकार आपल्या दारी कार्यक्रम करत आहे. हे सरकार नागरिकांच्या दारी लाठीकाठी घेऊन का येत आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
राज्य सरकारवर जनतेचा तीळमात्र विश्वास राहिला नाही. सरकारचे राज्यातील प्रश्नांकडे लक्षच नाही. सरकार केवळ बिल्डर, कंत्राटदार आणि खोक्यांसाठी काम करते आहे. आज पाऊस पडला नाही. नागरिक आणि शेतकऱ्यांना सरकारी मदतीची गरज आहे. दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे. असे असताना राज्य सरकार मात्र ते करत नाही. जनतेच्या आपेक्षा आणि प्रश्न याला बगल देऊन जे काही करता येईल ते सगळे सरकार करत आहे. त्यांची नागरिकांना मदत करण्याची भावना नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Maratha Reservation Jalna News: जालना लाठीचार्ज प्रकरणी पहिली कारवाई, एसपी तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर)
शांततेने सुरु असलेल्या आंदोलनावर पोलीस बळाचा वापर करुन लाठीमार करणे हे केवळ मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच होऊ शकते. नागरिकांवर ज्या पद्धतीने अमानुषपणे लाठीचार्ज झाला तो पाहता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. महिला, लहानमुले आणि सामान्यांवर हल्ला करणारे हे सरका महारहाष्ट्रद्रोही असल्याची घणाघाती टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. जालन्यात जे घडले ते आपण सर्वांनी पाहिले आहे. लाठीचार्ज खूप क्रूर होता जणू काही तुम्ही तुमच्या शत्रूवर हल्ला करत आहात. मुख्यमंत्र्यांना न सांगता पोलिस लाठीमार करतील हे शक्य नाही. राज्य सरकारला थोडी लाज असेल तर राजीनामा द्यावा, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.