SP Tushar Doshi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Jalna Lathicharge Case First Action: मराठा आरक्षण आंदोलकांवर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी राज्य सरकारने पहिली मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी (SP Tushar Doshi) यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. राज्य सरकारच्या गृहमंत्रालयाने ही करावाई केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागणीवर आंदोलक अद्यापही ठाम आहेत. पोलिसांनी केलेल्या या लाठीमाराचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.

शांतताप्रिय मार्गाने सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर पोलिसांनी अचानकच अशा प्रकारचा अमानुष लाठीमार का केला असावा? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. महाराष्ट्रभरातून या पोलिसी कारवाईचा निषेध करण्यात आला आहे. राजकीय नेत्यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून सत्ताधारी वगळता जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आंदोलकांची भेट घेऊन विचारपूस केली. यात शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण तसेच मनसेचे बाळा नांदगावरकर अशा अनेक नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान, मराठा मोर्चा आक्रमक झाला असून विविध ठिकाणी कडेकोट बंद पुकारण्या आला आहे. मुंबईतही दादर आणि काही ठिकाणी मोर्चे निघाले आहेत. खास करुन मराठवाड्यामध्ये तीव्र पडसाद उमठताना दिसता आहेत. पुण्यातून मराठवाड्याच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या जवळपास 600 बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो आहे. दुसऱ्या बाजूला यवतमाळ जिल्ह्यातून नांदेड, पुणे, संभाजीनगरसह मराठवाड्याकडे जाणाऱ्या 16 गाड्या स्थगित करण्यात आल्या असल्याची माहिती आहे. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचे समजते. राज्यात पुन्हा एकदा मराठा मोर्चाचा प्रश्न चर्चेला येण्याची शक्यता आहे. पुढच्या काही काळात केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण मुद्दा चर्चेला आणला जावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे.