महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Maharashtra Governor BS Koshyari) यांच्याकडून वारंवार येत असलेल्या आक्षेपार्ह विधानांवरून महाराष्ट्रभर संतापाची लाट आहे. समाजसुधारक ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर विविध स्तरातून राज्यपालांचा निषेध करण्यात आला आहे. महाराष्ट्रात विरोधकांकडून राज्यपाल हटाव ची मागणी देखील जोर धरत आहे. अशामध्ये आज जालना बंद (Jalna Band) ची हाक देण्यात आली आहे. आज जालना मध्ये राज्यापालांविरोधात बंद पाळला जाणार आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याप्रमाणेच भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याकडूनही झालेल्या आक्षेपार्ह विधानानंतर महाराष्ट्रात महापुरुषांचा वारंवार होणारा अवमान थांबवावा यासाठी मागणी जोर धरत आहे. दरम्यान काल यावर आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा क्रांती मोर्चा, समविचारी पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची जालना बंदच्या नियोजनाची बैठक घेण्यात आली. बंदला जिल्हा होलसेल किराणा मार्केट, भुसार मार्केट, भाजी मार्केट, खत मार्केट, हमाल-मापाडी, वकील संघ, काँग्रेस असंघटित कामगार संघटना, मराठा महासंघ, मराठा सेवा संघ इतर संघटनांनी पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल BS Koshyari देणार पदाचा राजीनामा? राजभवनने दिले स्पष्टीकरण, घ्या जाणून .
महाविकास आघाडी मधील पक्षाकडूनही मुंबईत 17 डिसेंबर दिवशी विराट मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळेस महाराष्ट्रप्रेमींनी मोर्च्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे. तसेच या मोर्च्यापूर्वी राज्यपालांची उचलबांगडी झाली तरीही हा मोर्चा होईल असं अजित पवार म्हणाले आहेत.