महाराष्ट्राचे राज्यपाल बीएस कोश्यारी (BS Koshyari) हे नेहमीच आपल्या वक्त्यव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नुकतेच त्यांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल एक विधान केले होते, ज्यामुळे त्यांच्यावर कडाडून टीका चालू आहे. या विधानानंतर राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अशात बातमी आली होती की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींकडे आपल्या पदावरून आणि जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. म्हणजेच त्यांनी राजीनामा देण्याबद्दल भाष्य केले आहे.
वादग्रस्त टिप्पण्यांमुळे, गोंधळामुळे दुखावलेल्या कोश्यारी यांना त्यांचे गृहराज्य उत्तराखंडमध्ये परतायचे आहे, असे माध्यमांनी सांगितले होते. अनेक माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले होते. सोशल मिडियावरही ही बातमी व्हायरल होत होती. परंतु आता राजभवनच्या प्रवक्त्याने सोमवारी हे दावे फेटाळून लावले. हे वृत्त निराधार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
याआधी, औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना कोश्यारी म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आताच्या काळातील आदर्श आहेत. यानंतर राज्यपालांवर टीका व्हायला सुरुवात झाली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा कथित अपमान केल्याबद्दल, कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. (हेही वाचा: भगतसिंग कोश्यारींच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानावरून वाद चिघळला; Uddhav Thackeray यांचा महाराष्ट्र बंदचा विचार)
ते म्हणाले होते की, ‘महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सातत्याने राज्यातील आदर्शांचा अपमान करत आहेत. मी विविध राजकीय पक्षांच्या लोकांना त्यांच्या विरोधात एकजूट व्हावे आणि राज्यपालांना परत बोलावण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्याचे आवाहन करतो.’ यानंतर मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबादमध्ये - महाविकास आघाडीच्या नेतृत्वात - राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी करत निदर्शने झाली.