
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय राजधानीमध्ये आपल्या खासदारांशी संवाद साधला आणि आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. हा दौरा आणि त्यातील दिनक्रम अगदी साधा आणि थोडक्यात असला त्यातील घडामोडी बोलक्या आहेत. उल्लेखनीय असे की, सध्याचा काळ आदित्य यांच्यासाठी अत्यंत कठीण आणि मोठा संघर्षाचा आहे. एका बाजूला राजकीय पक्ष हिरावून घेतल्याचे शल्य, त्यामुळे संघटनात्मक पातळीवर निर्माण झालेली पोकळी, पक्ष आणि राजकीय संघटन पुन्हा नव्याने उभारण्याचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेला पराभव, अशा एक ना अनेक पातळ्यांवर त्यांना लढावे लागत आहे. तरीदेखील आदित्य यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये प्रभावशाली असलेल्या नेत्यांची भेट घेणे आणि त्यांच्याशी राजकीय धोरणांवर विचारविनिमय करणे हे त्यांना राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा पैस विस्तारणारे असल्याचे मानले जात आहे.
ऑपरेशन टायगर आणि दिल्ली दौरा
राजधानी दिल्ली येथे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे देशभरातील जवळपास सर्वच पक्षांचे खासदार दिल्ली येथे आहेत. महाराष्ट्रही त्यास अपवाद नाही. सहाजिकच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना (UBT) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अशा दोन्ही पक्षाचे खासदार दिल्ली येथे आहेत. असे असले तरी शिवसेना पक्षात फुट पडल्यामुळे दोन्ही गटांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष आहे. अशा पार्श्वभूमीवर शिंदे गटातील एका खासदाराने ठेवलेल्या स्नेहभोजनास ठाकरे गटाचे तीन खासदार उपस्थित राहिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून आले. वास्तविक पाहता ही घटना दखलपात्र आहेच असे नाही. कारण कितीही राजकीय संघर्ष असला तरी, एकमेकांच्या सुख-दुख:त सोबत राहणे महाराष्ट्राची परंपरा आहे. तरी देखील सध्याचा राजकीय संघर्ष आणि नेत्यांची व्यक्तीगत शेरेबाजी पाहता प्रसारमाध्यमांतून ही घटना अधिकच उचलून धरली गेली. त्या दरम्यानच आदित्य ठाकरे यांचा दिल्ली दौरा चर्चेत आला. या दौऱ्यात त्यांनी दिल्लीमध्ये आपल्या खासदारांशी संवाद साधला आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या स्नेहभोजनास जाताना पक्षाची परवानगी घ्यावी अशी सूचना केली. त्यामुळे त्यांचा दिल्ली दौरा गाजला. (हेही वाचा, Aaditya Thackeray: विश्वासू माणसाने पक्ष सोडला; आदित्य ठाकरे दिल्लीला रवाना)

राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट
पक्ष सत्तेत असताना एखादी भूमिका घेणे किंवा एखाद्या विचारासाठी प्रयत्न करणे, हे अनेकदा तुमच्या निर्णयास पूरक ठरते. पण, पक्ष सत्तेत नसताना त्यातही सत्तेचा धाक दाखवून फोडला जात असताना आणि उरलेल्याही शिलेदारांपैकी काहींना विविध प्रलोभने दाखवून ताकत खच्ची करण्याचे प्रकार सुरु असताना सत्तेविरुद्ध टिकून राहणे कठीण ठरते. अशा आव्हानाच्या काळातही आदित्य ठाकरे बाजी पलटण्याचा आत्मविश्वास बाळगून आहेत. विधिमंडळात आमदारांची संख्या घटली असली तरीदेखील ते जिद्दीने लढत आहेत. सरकारशी 'मार्मिक' 'सामना' करत आहेत. असे असतानाच त्यांनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. हे दोन्ही नेते राष्ट्रीय राजकारणात प्रभाव टाकून आहेत. त्यांची भेट घेऊन आगामी काळात राष्ट्रीय पातळीवर विरोधकांनी अधिक घट्ट राहण्याची आवश्यकात असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले आहे. मधल्या काळात ते इतरही विरोधी पक्षातील राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना भेटले होते. (हेही वाचा, Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; आदित्य ठाकरेही होते उपस्थित)
शरद पवार यांची भेट टाळली
आदित्य ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यात आणखी एक घडलेली महत्त्वाची आणि उल्लेखनीय घटना म्हणजे त्यांनी शरद पवार यांची टाळलेली भेट. पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्ष महाराष्टात महाविकासआघाडी आणि राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचा घटक आहे. असे असताना त्यांनी दिल्ली येथील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अशा पद्धतीने कौतुकोद्गार काढले की, ज्यातून अधिक संभ्रम तयार होईल. ते पाहता शिवसेना (UBT) पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली. इतकेच नव्हे तर आदित्या ठाकरे यांनी दिल्लीत असतानादेखील शरद पवार यांची भेट घेणे टाळले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी दबावाचे, सडेतोड राजकारण करण्यात कसूर ठेवली जाणार नाही, असा संदेश आपल्या मित्रपक्षांना दिला. परिणामी ही घटनाही राष्ट्रीय राजकारणात अनेकांसाठी लक्ष्यवेधी ठरली.

वय आणि राजकीय अनुभाव जमेची बाजू
वरील तिन्ही घटनांचा विचार करता महत्त्वाची बाब अशी की, राजकारणात दिवस बदलत असतात. सत्ता येते जाते. परिस्थिती निर्माण होते, काळासोबत ती बदलली जाते. अशा काळात येणारे अनुभव कोणत्याही व्यक्तीस खास करुन राजकीय व्यक्तीस अधिक समृद्ध बनवततात. सहाजिक आदित्य ठाकरे या अनुभवातूनजात आहेत. त्यांचे वय आणि त्यांना मिळणाऱ्या संधी, त्याच्यापुढे निर्माण झालेली परिस्थीती आणि त्याच्याशी संघर्ष करताना येणारे अनुभव यातून आदित्य ठाकरे यांच्यासारखे तरुण व्यक्तीमत्व ताऊन सुलाखून बाहेर पडते आहे. त्यामुळे आगामी राजकारणाचा वेध घेता आणि राष्ट्रीय पातळीवर खास करुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेतृत्वाच्या पातळीवर विचार केला तर जवळपास सर्वच नेते पन्नाशी पार आहेत. त्यामुळे त्यात एखादाच तरुण नेता तुरळकपणे दिसतो आहे. अशा काळात आदित्य ठाकरे यांनी मोर्चेबांधणी केली. आणि राष्ट्रीय पातळीवर राजकीय मित्र जमवले त्यांच्याशी सौहार्दाचे संबंध निर्माण केले तर भविष्यात जेव्हा केव्हा त्यांना अनुकुल राजकीय परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा त्यांना राष्ट्रीय पातळीवर पैस उपलब्ध असेल. जो ते आता निर्माण करु पाहात आहे. अर्थात, राजकारणात काहीही घडू शकते त्यामुळे भविष्यात इतक्यात आडाखे बांधणे अनुचीत ठरेल. त्यासाठी येणाऱ्या काळाकडेच पाहायला हवे.