Aaditya Thackeray | (Photo Credit - Facebook)

शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू आणि पक्षात झालेल्या फुटीनंतर निर्माण झालेल्या आव्हानांमध्येही 'मातोश्री' सोबत राहणारे राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी पक्ष सोडला आहे. त्यांनी पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आणि आज (13 फेब्रुवारी) ते ठाणे शहरातील टेंभी नाका येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) दिल्लीला रवाना झाले आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निवास्थानी आयोजित बैठकीत ते पक्षाच्या खासदारांशी संवाद साधतील. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भेटीनंतर ते  दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचीही ते भेट घेणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

खासदार संजय दिना पाटील जोरदार चर्चेत

उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाकडून 'ऑपरेशन टायगर' राबवले जाणार असल्याची चर्चा आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे यांच्या कंपूतील काही आमदार आणि खासदार पक्ष सोडतील. ठाकरे गटाकडून या दाव्याचे वेळोवेळी खंडण करण्यात आले असले तरी, शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे कालच (12 फेब्रुवारी) एक जाहीर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास ठाकरे गटातील खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते. या उपस्थितीवरुन उलटसुलट चर्चा आहेत. (हेही वाचा, Rahul Gandhi On Delhi Election Results: 'लढाई सुरूच राहील'; दिल्ली निवडणूक निकालांवर राहुल गांधींची प्रतिक्रिया)

शरद पवार यांची स्तुतीसुमने, संजय राऊत यांची नाराजी

विशेष म्हणजे महाविकासआघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे प्रमख शरद पवार यांनी शिंदे यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले. त्यावरुन खासदार संजय राऊत यांनी नाराजीही व्यक्त केली. मात्र, असे असले तरी खासदार पाटील यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. स्वत: खासदार संजय दिना पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे कारण सांगितले असले तरीही या चर्चा कायम आहेत. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचे दिल्लीत उपस्थीत असणे याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. (हेही वाचा, BMC Election 2025: उद्धव ठाकरेंची शिवसेना बीएमसी निवडणूक 2025 एकट्याने लढणार; Sanjay Raut यांची मोठी घोषणा)

पराभवावर विश्लेषण?

दिल्ली विधानसभा निवणूक 2025 मध्ये काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षास मोठा पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्रातही शिवसेना (UBT) आणि काँग्रेसचा पराभव झाला. या पराभवाच्या विश्लेषणार्थ आदित्य ठाकरे, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठका स्वतंत्र होणार असल्याचे समजते.

दरम्यान, दिल्लीतील पराभवास काँग्रेस आणि आप यांच्यात परस्परांमध्येच झालेला राजकीय संघर्ष कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. त्यामुले आगामी काळात इंडिया आगाडीत मोठी फाटाफूट होते की, काय अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांना घट्टन बांधून ठेवण्यासाठी आदित्य ठाकरे पुढाकार घेतात की, काय याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.