औरंगाबादमधील एमजीएम रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
MGM Medical College & Hospital, Aurangabad (PC - Facebook)

औरंगाबादमधील (Aurangabad) एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरोना संशयित वडिलांचा उपचारादारम्यान मृत्यू झाल्याचे समजताचं दोन भावानी आरडाओरड करत डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्याना मारहाण केली. यावेळी या दोघांनी व्हेंटिलेटरसह रुग्णालयातील जवळपास पन्नास हजाराच्या साहित्याची तोडफोड केली.

जितेंद्र प्रभुलाल जैस्वाल आणि विजेंद्र प्रभुलाल जैस्वाल अशी रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या दोघांची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभुलाल जैस्वाल यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना रुग्णालयातील कोविड वॉर्डातील ईआयसीयू मध्ये हलवण्यात आलं होतं. (हेही वाचा - ITI Online Admission: औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; नवाब मलिक यांची माहिती)

दरम्यान, बुधवारी रात्री 11 वाजता उपचारा दरम्यान प्रभुलाल जैस्वाल यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने याबद्दल जैस्वाल यांच्या दोन्ही मुलाला यासंदर्भात माहिती दिली. वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकताचं जितेंद्रने रुग्णालयात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तसेच कोवीड वॉर्डातील आयसीयूमधील वस्तूची तोडफोड केली.

याशिवाय रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीदेखील डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.