कौटुंबिक किंवा वयैक्तिक वादातून अनेक दाम्पत्य ऐकमेकांपासून विभिक्त होण्याचा निर्णय घेतात. पुरुषांबरोबर महिलांनाही घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करण्याचा अधिकार आहे. मात्र, अकोला (Akola) जिल्ह्यातील वडगाव (Wadegaon) गावात एका घटस्फोटीत महिलेने दुसरे लग्न केले म्हणून जात पंचायतने तिला विकृत शिक्षा सुनावली आहे. या महिलेला जात पंचायतने थुंकी चाटण्याची आणि एक लाख रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे. परंतु, संबंधित महिलेने दोन्ही शिक्षा नाकारल्या आहेत. तसेच या महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात जावून जात पंचायतीच्या सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला 35 वर्षांची असून ती नाथ जोगी समाजाची आहे. या महिलेचे 2015 मध्ये पहिले लग्न झाले होते. परंतु, वैयक्तिक कारणांमुळे संबंधित महिला 2019 साली आपल्या पतीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर तिने दुसरे लग्न केले. परंतु, या महिलेने दुसरे लग्न केल्यामुळे ही जात पंचायत भरवण्यात आली होती. जात पंचायतीच्या या सभेमध्ये तिची बहीण आणि इतर नातेवाईकांना बोलावण्यात आले आणि या प्रकरणाचा ‘निकाल’ देण्यात आला. त्यानुसार, जात पंचायतीचे सर्व सदस्य एका केळीच्या पानावर थुंकणार आणि त्या महिलेला चाटावे लागणार आहे. याशिवाय, या महिलेला एक लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. त्यानंतरच तिला समाजात स्विकारले जाणार असल्याचे सांगण्यात आले. महिलेल्या नातेवाईकांनी तिला या घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर संबंधित महिलेने जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेऊन जात पंचायतच्या सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे देखील वाचा- Mumbai: कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर मास्क विक्री करणाऱ्या दुकानदारांना RPSF जवानांनी केली मारहाण; कोरोना संसर्ग पसरवण्याचा केला आरोप
याप्रकरणी या महिलेने सुरुवातीला जवळच्या चोपडा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु, ही महिला पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी आहे. त्यानंतर हे प्रकरण ज्या ठिकाणी घडले, तेथील म्हणजेच अकोल्यातील पिंजर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे.