Mumbai Local Train | (File Image)

Mumbai: रेल्वे संरक्षण दलाने (RPF) बुधवारी तीन महिला प्रवाशांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला आहे. या महिलांनी मंगळवारी इतर महिला प्रवाशांना सकाळी 7.51 वाजता कर्जत-सीएसएमटी फास्ट ट्रेन (Karjat-CSMT Fast Train) बदलापूर (Badlapur) ला पोहोचली तेव्हा त्यात चढण्यापासून रोखले होते. इतरांना आत येऊ नये म्हणून आरोपींनी प्रथम श्रेणीच्या डब्याचा दरवाजा बंद केला. रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही महिलांवर रेल्वे कायद्याच्या कलम 145 आणि 146 अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

महिला आरपीएफ पथकाने बुधवारी त्याच ट्रेनच्या डब्यात प्रवेश केला आणि महिलांची ओळख पटवली. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी या आरोपी महिलांना अंबरनाथ स्थानकावर उतरवले. मध्य रेल्वेचे सीपीआरओ शिवराज मानसपुरे म्हणाले, आम्ही रेल्वे कायद्यांतर्गत महिलांवर गुन्हा दाखल केला असून कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. (हेही वाचा - Mumbai Local Train Viral Video: कर्जत सीएसएमटी लोकल ट्रेनमध्ये महिला डब्याचा दरवाजा बंद, प्रवाशांमध्ये संताप (Watch Video))

दरम्यान, पुढची कर्जत-सीएसएमटी गाडी सकाळी 8.25 वाजता आली तेव्हा सामान्य डब्यातही पुरुष प्रवाशांनी दरवाजे बंद केल्याने असाच प्रकार घडला. RPF आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी (GRP) प्रवाशांना याबाबात कारवाईचा इशारा दिला आहे. 2011 च्या जनगणनेपासून कल्याण ते कर्जतपर्यंतच्या प्रदेशाची लोकसंख्या सात ते आठ पटीने वाढली आहे, परंतु रेल्वे सेवा स्थिर राहिल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांच्या गटांमध्ये जास्त गर्दी आणि घर्षण वाढले आहे.

बदलापूर रेल्वे असोसिएशन कमिटीचे प्रमुख संजय मेस्त्री म्हणाले, मी 2002 पासून बदलापूरमध्ये राहतो आणि इतकी वर्षे ट्रेनने प्रवास करतो. गेल्या पाच वर्षांत या स्थानकावरील प्रवाशांची संख्या पाचपट वाढली आहे. दुर्दैवाने, महिलांचे डबे समान आकाराचे राहिले आहेत. गर्दीच्या वेळी त्यांच्यासाठी विशेष गाड्या नाहीत. आम्ही मध्य रेल्वेला ट्रेनची वारंवारता वाढवावी, महिला स्पेशल चालवावी किंवा कल्याण ते कसारा आणि कर्जत या ट्रेनची व्यवस्था करावी, अशा विनंत्या करत आहोत. पण आमच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या जात नाहीत.