98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan

मराठी साहित्यिक, लेखक, कवी, आणि वाचकांचे वार्षिक संमेलन म्हणजे, 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन'. यामध्ये मराठी साहित्याच्या विविध अंगांवर चर्चा, परिसंवाद, आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या संमेलनाची सुरुवात 1878 साली पुणे येथे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आता आजपासून दिल्ली येथे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होत आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 4.30 वाजता याचे उद्घाटन होणार असून, हे संमेलन 23 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत.

उद्घाटनानंतर संमेलनाध्यक्ष डॉ.ताराबाई भवाळकर संध्याकाळी 6.30 वाजता तालकटोरा स्टेडियम येथे दुसऱ्या उद्घाटन सत्रात आपले अध्यक्षीय भाषण देतील. या संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट मराठी साहित्याचा प्रसार, संवर्धन, आणि विकास करणे आहे. दरवर्षी, हे संमेलन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जाते, ज्यामुळे विविध क्षेत्रांतील साहित्यिक आणि वाचकांना एकत्र येण्याची संधी मिळते. संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिकांना त्यांच्या नवीन साहित्यकृती सादर करण्याची, तसेच वाचकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते.

दिल्लीत होणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, मंत्री उदय सामंत आणि आशीष शेलार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू, नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेतेमंडळीदेखील या संमेलनात उपस्थिती दर्शवतील. (हेही वाचा: Delhi 98th Marathi Sahitya Sammelan: येत्या 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत होणार 98 वे मराठी साहित्य संमेलन; PM Narendra Modi यांच्या हस्ते उद्घाटन, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम)

संमेलनात  विविध तज्ज्ञमंडळ चर्चा, पुस्तक प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम  आणि प्रसिद्ध साहित्यिकांसोबत संवाद सत्रांचे  आयोजन केले जाईल. हे संमेलन मराठी साहित्याच्या कालातीत प्रासंगिकतेचा उत्सव साजरा करेल आणि समकालीन प्रवाहातील आपल्या भूमिकेचा शोध घेईल. भाषा संवर्धन, भाषांतर  आणि साहित्यकृतींवर डिजिटलायझेशनचा प्रभाव या संकल्पनांचा यात  समावेश आहे. यामध्ये 2,600 हून अधिक काव्य सादरीकरणे,  50   पुस्तकांचे प्रकाशन आणि  100 पुस्तकांचे स्टॉल्स असतील. देशभरातील प्रतिष्ठित विद्वान, लेखक, कवी आणि  साहित्यप्रेमी यात सहभागी होतील. देशाच्या राजधानीत 71 वर्षांनंतर होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात पुणे ते दिल्ली असा एक प्रतीकात्मक साहित्यिक रेल्वे प्रवासदेखील घडला असून,  1200 साहित्यिक विशेष एक्सप्रेसने दिल्लीला पोहोचले आहेत.