मुंबई -पुणे (Mumbai -Pune) हा प्रवास अनेकांसाठी नेहमीचा असतो. काहीवेळेस वेळ वाचवण्यासाठी थेट बससेवेऐवजी अनेकजण प्रायव्हेट कारची निवड करतात मात्र असा अनोळखी व्यक्तींसोबतचा कारप्रवास मुंबई- पुणे रस्त्यावर सुरक्षित नसल्याची अजून एक घटना समोर आली आहे. मुंबईच्या एका 26 वर्षीय तरूणाला याच मार्गावर शस्त्राच्या धाकावर लुटल्याची घटना समोर आली आहे.
रोहित कारेकर या 26 वर्षीय तरूणासोबत असाच एक थरारक प्रकार घडला आहे. पुण्याच्या वाकड पूलावरून मुंबईच्या दिशेने रोहितला प्रवास करायचा होता मात्र बसची वाट पाहत असलेल्या रोहितला रस्स्त्यावरून जाणार्या प्रायव्हेट कारने लिफ्टसाठी विचारले. गाडीमध्ये अन्य चार पुरूष बसले होते. संध्याकाळी साडे सातच्या सुमारास निघालेल्या या सहप्रवाशांनी रोहितला उर्से टोल नाका पार केल्यानंतर शस्त्र दाखवून घाबरवले. त्याच्याकडील सोन्या, चांदीचे दागिने लुटले, डेबिट कार्ड काढून त्याच्या पिन नंबरवरून 26,000 रूपये काढून घेतले. याप्र्कारानंतर ताथवडे कॉलेजजवळ त्याला सोडून दिले. रोहितने या प्रकाराची पोलिसामध्ये तक्रार केली आहे.
मुंबई पुणे या रस्स्त्यावर अशाप्रकारे लिफ्ट देण्याच्या मदतीतून प्रवाशांना लुटण्याच्या अनेक घटना मागील काही महिन्यांत समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी एका मराठी न्यूज चॅनेलच्या पत्रकाराचीदेखील अशाप्रकारे लूट करण्यात आली होती.