
महाराष्ट्राचे मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी यांनी हिंदू समाजाने मल्हार सर्टिफिकेशन असलेल्या दुकानांमधून मांस खरेदी करण्याचं आवाहन केले आहे. दरम्यान त्यासाठी आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट दिले जाणार आहे. आज पासून या सर्टिफिकेशनची सुरूवात देखील करण्यात आली आहे. मंत्री नितेश राणे यांनी त्याबाबतची माहिती X वर पोस्ट करत दिली आहे. मल्हार सर्टिफिकेशन नसेल तर मांस खरेदी करू नका, असे आवाहन त्यांनी केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मल्हार सर्टिफिकेशन
मल्हार सर्टिफिकेशन साठी malharcertification.com सुरू केल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली आहे. यामध्ये मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील व १०० टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ झालेले आढळणार नाही. तसेच या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे निश्चित. असे त्यांनी एक्स वरील पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
नितेश राणे पोस्ट
आज मल्हार सर्टिफाइड झटका मांस
आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम(https://t.co/fQAwGvAdca) या निमित्ताने सुरू झालेलं आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील व १००… pic.twitter.com/u0zdi2rjBt
— Nitesh Rane (@NiteshNRane) March 10, 2025
हे भारतातील सध्याच्या हलाल प्रमाणपत्रासारखेच आहे, जिथे मांस शरिया किंवा इस्लामिक कायद्यानुसार तयार केले जाते.हलाल कत्तलीच्या पद्धतीच्या अगदी विरुद्ध, झटका मीट एकाच फटक्यात वेदनारहित पद्धतीने प्राण्याला मारल्यानंतर तयार केले जाते.
मल्हार वेबसाइट वर दिलेल्या माहितीनुसार, हे झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांसाठी एक सर्टिफाईड प्लॅटफॉर्म आहे. बकरी किंवा मेंढीचे मांस "हिंदू धार्मिक परंपरेनुसार तयार केले जाते आणि बळी दिले जाते." असा दावा करण्यात आला आहे. वेबसाइटवर मांस "ताजे, स्वच्छ, saliva contamination पासून मुक्त आहे आणि इतर कोणत्याही प्राण्यांच्या मांसात मिसळलेले नाही." असेही सांगण्यात आले आहे.