Philippines मध्ये सुरु झाले बेटावर असणारे जगातील सर्वात महागडे रिसॉर्ट; जाणून घ्या खासियत आणि दर (फोटो)
Banwa Private Island (संग्रहित-संपादित प्रतिमा)

पश्चिम फिलिपिन्समधील (Philippines) बेटावर दूरवर पसरलेले एक अलिशान रिसॉर्ट पर्यटकांसाठी खुले झाले आहे. हे रिसॉर्ट जगातील सर्वात महागडे रिसॉर्ट असल्याचा दावा केला जात आहे. बनवा प्राइव्हेट आयलँड (Banwa Private Island) असे याचे नाव असून, ते पालावान द्वीपसमूह (Archipelago of Palawan) जवळ, पुर्को बेटावर (Puerco Island) स्थित आहे. मनिलापासून दोन तासात हेलिकॉप्टर किंवा सीप्लेनने इथे पोहचता येते. या रिसॉर्टमध्ये तुम्ही राहण्यासोबतच  स्नॉर्कलिंग, कायाकिंग, जेट स्कीइंग, स्कुबा डायविंग, नौकायन, योगा आणि टेनिस अशा अनेक गोष्टींचा लाभ घेऊ शकता.

सुविधा -

बेटावर असणाऱ्या या रिसॉर्टमध्ये, सहा बीचफ्रंट व्हिला (एक ते चार शयनकक्षांपर्यंत), प्रत्येक व्हिलामध्ये एक खाजगी इन्फिनिटी पूल आणि जकूझी आहेत. तसेच स्वतंत्र गार्डन असलेल्या 12 खोल्या आणि उच्च स्तरीय निवासी सुटस आहेत. या बेटावर एकावेळी 48 लोक राहू शकतात. या बेटावर शाकाहारी आणि मांसाहारी जेवण बनवणारा स्टाफ दिमतीला आहे. खासकरून जवळच शेतात पिकवलेल्या भाज्या आणि समुद्रातील मासे जेवणासाठी वापरल्या जातात. या बेटावर इथली, इथल्या जलचर, वन्यजीवांची इत्यंभूत माहिती देणारे गाईडदेखील इथे उपलब्ध आहेत. या आयलॅंडच्या खिडक्या, फ्लोअर आणि सीलिंग असे डिझाईन केले आहे की, पर्यटक खोलीत बसून बाहेरील समुद्राचा किंवा वातावरणाचा अनुभव घेऊ शकतील. (हेही वाचा: भारतातील या ठिकाणी भारतीयांना जाण्यास बंदी; परदेशी नागरिक घेऊ शकतात उपभोग)

दर -

इथे जाण्यासाठी मनिलापासून नऊ-पॅसेंजर सीप्लेनचा वापर करू शकता, ज्याचा वन वे दर प्रति 990 डॉलर इतका आहे. तसेच पाच प्रवासी हेलीकॉप्टरचे तिकीट  येण्या जाण्यासाठी 11,580 डॉलर इतके आहे. इथे राहण्यासाठी तुम्हाला, उपलब्धतेनुसार कमीत कमी 3-5 रात्री बुक कराव्या लागतात. इथे राहण्याचे एका दिवसाचे भाडे हे 100,000 डॉलर म्हणजेच 70,040,50 रुपये इतके आहे.