
जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील भारताची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. पर्यटन क्षेत्रही असेच विकसित होत आहे. अगदी कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत असलेली अनेक ठिकाणे जगप्रसिद्ध आहेत. विदेशी पर्यटकांचीही भारताला पसंती असलेली दिसून येते. मात्र भारतात अशी काही ठिकाणे आहेत, जिथे चक्क भारतीयांनाच जाण्यास बंदी आहे. धोकादायक ठिकाणे, सरकारी प्रोजेक्ट्स अशा अनेक कारणांनी काही ठिकाणी मुद्दाम बंदी घातली जाते, मात्र यात अशी काही ठिकाणे आहेत जिथे परदेशी नागरिक जाऊ शकतात मात्र भारतीयांना तिथे परवानगी नाही.
> फ्री कसोल कॅफे (Free Kasol Café) - हिमाचल प्रदेशमधील कसोल हे ठिकाण पर्यटकांच्या विशेष पसंतीचे समजले जाते. या ठिकाणाला भेट देणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. या ठिकाणी एक रेस्टॉरंट आहे, 'फ्री कसोल कॅफे'. या ठिकाणी भारतीय लोकांना येण्यास परवानगी नाही. कसोल या गावाला 'मिनी इजराईल' देखील म्हटले जाते, कारण या भागामध्ये इजराईली लोकांची जनसंख्या जास्त आहे.
> रेड लॉलिपॉप होस्टेल (Red Lollipop Hostel) – चेन्नईमधील हे हॉस्टेल फक्त भारत फिरण्यासाठी आलेल्या परदेशी नागरिकांसाठी उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे बाहेरील देशाचा पासपोर्ट असेल तर इथे तुम्हाला एंट्री मिळेल. (हेही वाचा : ही आहेत भारतातील शापित पर्यटनस्थळे; पुण्यातील हे भुताटकी ठिकाण तर आहे जगप्रसिद्ध)
> उनो इन हॉटेल (Uno-In Hotel) – बेंगलोरमधील हे एक प्रसिद्ध हॉटेल होते. या ठिकाणी फक्त जपानी लोकांनाच प्रवेश दिला जात असे. मात्र अशा प्रकारच्या भेदभावामुळे हे हॉटेल बंद करण्यात आहे.
> मलाना गाव (Malana) – या गावात अलेग्झांडर दी ग्रेटचे सैन्य वास्तव करत असा लोकांचा समज आहे. हे गाव पृथ्वीवरील प्राचीन लोकशाहींपैकी एक आहे. या गावामध्ये स्वतंत्र शासकीय यंत्रणा आहे. सर्वसामान्यांना लागणारी सामग्री स्थानिक नागरिक गावातच तयार करतात. बाहेरील व्यक्तीने इथे प्रवेश केला तर त्याला घुसखोर समजले जाते.
> ब्रॉडलंड हॉटेल (Broadlands Hotel) - चेन्नई येथील या हॉटेलमध्ये फक्त परदेशी नागरिकांना प्रवेश दिला जातो. जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर इथे तुमचे स्वागत आहे, नाहीतर तुम्ही इथे पायही ठेऊ शकणार नाही.
> गोव्यातील बीचेस – गोव्यामध्ये असे अनेक बीचेस आहेत जिथे फक्त परदेशी नागरिकच जाऊ शकतात. या बीचेसवर भारतीय नागरिकांना जाण्यास मनाई आहे. 'फॉरेनर्स ओन्ली' म्हणून ओळखले जाणारे असे बीचेस पुदुच्चेरीमध्ये देखील आहेत.