छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची माहिती पुढील पिढ्यांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यामार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक व रामटेक येथे सहा ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय व शिवकालीन थीम पार्क उभारणार आहे. या सर्व कामांसाठी ४१० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून एक वर्षभरात सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
मंत्री लोढा म्हणाले, राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी व त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी राज्य शासन व पर्यटन विभाग विविध उपक्रम राबवत आहे. राज्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायचा असतो, हेच लक्षात घेवून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबाबत सर्व माहिती या शिवसृष्टीतून पर्यटन व शिवप्रेमींना मिळण्यास मदत होणार आहे.
शिवसृष्टीच्या कामाबाबत जनतेच्या आलेल्या सूचनांनुसार या कामामध्ये बदल करण्यात येईल. तसेच विविध लोगो स्पर्धांचे आयोजनही करण्यात येईल. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ७० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोराई (मुंबई) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली व आता त्या ठिकाणी २५ एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार आहे.
बुलढाणा येथे राजमाता जिजाऊ संग्रहालय, औरंगाबाद येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय, नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय, रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी ५० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. या शिवसृष्टी, उद्यान आणि म्युझिअम, थीम पार्कच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा तसेच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल.