भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने भारत गौरव पर्यटक ट्रेन (New Bharat Gaurav Train) सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही ट्रेन पुणे, उज्जैन, आग्रा, मथुरा, हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि वैष्णोदेवी शहरांमध्ये प्रवास करेल. येत्या 22 जूनपासून सुरू होणारी ही 9-रात्र/10-दिवसांची यात्रा पर्यटकांना भारताची समृद्ध संस्कृती आणि अध्यात्म अनुभवण्याची संधी देते.
22 जून 2023 रोजी पुण्याहून सुरू होणारी, भारत गौरव टुरिस्ट ट्रेन 1 जुलै 2023 रोजी पुण्याला परतेल. ही यात्रा उज्जैन, आग्रा, मथुरा, हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि वैष्णोदेवी यांचा समावेश असलेल्या वर्तुळाकार मार्गाने प्रवास करेल.
रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या विशेष टूरसाठी प्रवासी अनेक ठिकाणांहून ट्रेनमध्ये चढू शकतील. नियुक्त केलेल्या बोर्डिंग थांब्यांमध्ये पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, सुरत आणि वडोदरा यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, उतरण्यासाठी वडोदरा, सुरत, वसई रोड, कल्याण, कर्जत, लोणावळा आणि पुणे असे थांबे असतील.
वेगवेगळ्या पसंती आणि बजेटनुसार भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने तीन वेगवेगळ्या श्रेणीतील राहण्याची सुविधा दिली आहे. इकॉनॉमी (स्लीपर क्लास), कम्फर्ट (एसी 3-टियर), आणि डिलक्स (एसी 2-टियर) अशा पर्य्यान्मधून प्रवासी त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडू शकतात. तीनही श्रेणीमध्ये प्रवाशांना आरामदायी प्रवासचा आनंद घेता येईल. (हेही वाचा: महिलांसाठी खुशखबर! वर्षभरात 30 दिवस महामंडळाच्या सर्व रिसॉर्ट्समध्ये मिळणार 50 टक्के सूट; राज्य सरकारचा मोठा निर्णय)
वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भारत गौरव टुरिस्ट ट्रेन पर्यटकांना अनेक प्रमुख आकर्षणांना भेट देण्याची संधी देऊन समृद्ध प्रवास अनुभवाचे आश्वासन देते. या प्रवासातील महत्वाच्या ठिकाणांमध्ये ओंकारेश्वर मंदिर, महाकालेश्वर मंदिर, ताजमहाल, कृष्ण जन्मभूमी, गंगा आरतीसह ऋषिकेश, सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डर, पूज्य माता वैष्णोदेवी मंदिर यांचा समावेश आहे.
भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या ट्रेन कंपोझिशनमध्ये एक एसी 2-टायर, तीन एसी 3-टायर, सात स्लीपर क्लास डबे, दोन जनरेटर व्हॅन आणि एक पॅन्ट्री कार यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.