Maharashtra Tourism: राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी 2,905 कोटी रुपयांचे सामंजस्य करार; तब्बल 6,754 रोजगाराची निर्मिती होणार
Aaditya Thackeray| Photo Credits: Twitter

कोरोना विषाणू (Coronavirus) काळात लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊननंतर अनलॉकमध्ये अनेक गोष्टी सुरु झाल्या आहेत. यामध्ये पर्यटन (Tourism) व्यवसायदेखील वाढत आहे. आता राज्यातील पर्यटनाला (Maharashtra Tourism) चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत, आदरातिथ्य क्षेत्रातील विविध घटकांसमवेत सुमारे 2,905 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आला. यातून राज्याच्या विविध भागात हॉटेल, रिसॉर्ट, वेलनेस सेंटर्स, हेल्थ फार्म, थिम पार्क. मेडीटेशन सेंटर, रोपवे, स्विमींग पूल, हॉटेल स्पा, हेल्थ क्लब, बोटींग आदी विविध पर्यटन सुविधांची निर्मिती होणार आहे.

महत्वाचे म्हणजे यामधून सुमारे 6,754 इतक्या रोजगाराची निर्मिती होणार आहे. राज्य शासनाने आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला असून यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. यापुढील काळातही या क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलू, असे यावेळी ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. शासनाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन धोरण, बीच सॅक धोरण जाहीर केले असून कॅराव्हॅन पर्यटन धोरण लवकरच जाहीर होत आहे. (हेही वाचा: Maharashtra Tourism: आता जनतेसाठी खुले होणार महाराष्ट्र विधानमंडळ; पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय)

या सर्व प्रकल्पांना गतिमान करण्यासाठी तसेच शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध धोरणे, योजनांचा त्यांना लाभ, सवलती मिळवून देण्यासाठी पर्यटन विभाग आणि पर्यटन संचालनालयामार्फत सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. हे सर्व प्रकल्प जून 2022 ते 2024 पर्यंत पूर्ण होणार आहेत. याशिवाय यावेळी जीवन कदम आणि सौरभ भट्टीकर या व्ह्लॉगर यांच्यासमवेतही पर्यटन संचालनालयाचा सामंजस्य करार करण्यात आला. हे व्ह्लॉगर राज्यातील पर्यटनाला सोशल मिडीयाच्या माध्यमातून चालना देणार आहेत.