Tulip Festival 2021| Photo Credits: Twitter/ Narendra Modi

उन्हाळी सुट्ट्या म्हणजे मित्रपरिवार, नातेवाईक आणि प्रियजनांसोबत फिरण्याचा काळ. सध्या महाराष्ट्रात उन्हाचा तीव्र कडाका असल्याने तुम्हांला त्यापासून थोडी सुटका हवी असेल तर उत्तर भारतात जम्मू कश्मीर हे उत्तम ठिकाण आहे. जम्मू कश्मीर मध्ये मार्चचा शेवट आणि एप्रिल महिन्याचा सुरूवातीचा आठवडा हा 'ट्युलिप फेस्टिवल' म्हणून साजरा केला जातो. श्रीनगर मध्ये दरवर्षी त्याच आयोजन कश्मीर टुरिझम बोर्ड कडून केले जातं. येथील इंदिरा गांधी मेमोरिअल ट्युलिप गार्डन हे आशिया मधील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन आहे. मग यंदा परदेश वारी करून ट्युलिप गार्डन पाहता येणार नसल्याने तुम्ही आपल्या भारतातील ट्युलिप गार्डन पाहण्याचं प्लॅनिंग करत असाल तर जाणून या Kashmir's Tulip Festival 2021 च्या तारखा, ट्रॅव्हल टीप्स आणि भटकंतीचा खास प्लॅन.

काही दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी मेमोरिअल ट्युलिप गार्डन चे फोटो शेअर करत त्याला भेट देण्याचं आवाहन केले आहे. 2008 सालपासून सुरू झालेलं हे ट्युलिप गार्डन आता देशा-परदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलं आहे. यंदा या गार्डन मध्ये 1.5 मिलियन ट्युलिप्सने सजलेली बाग पाहता येणार आहे.

कश्मीरच्या ट्युलिप गार्डन फेस्टिवलच्या तारखा

मार्च महिन्याचा शेवट किंवा एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून महिनाभरासाठी ट्युलिप गार्डन हे पर्यटकांसाठी खुलं करण्यात येतं. यंदा 25 मार्चपासून ते सुरू झालं आहे. पण तारखा पुढे- मागे होण्याची शक्यता असल्याने ट्रीप प्लॅन करण्यापूर्वी एकदा कश्मीर टुरिझमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

वेळ आणि प्रवेश शुक्ल

इंदिरा गांधी मेमोरिअल ट्युलिप गार्डन सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आठवडाभर खुले असते. भारतीयांसाठी प्रौढांना प्रति व्यक्ती 50 रूपये तर लहान मुलांना 25 रूपये फी आकारली जाणार.

कसे पोहचाल?

श्रीनगर हे देशातील महत्त्वाच्या सार्‍या शहरांसोबत हवाईमार्गे आणि रस्ते मार्गे जोडले गेले आहे. ट्रेनने जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जम्मू पर्यंत जाऊ शकता त्यापुढे रस्ते मार्गांनी तुम्ही जाऊ शकाल.

भारताता इतर शहरांच्या तुलनेत कश्मीर हे थंड शहर आहे. सध्या कोविड 19 चं संकट घोंघावत असल्याने त्याच्या दृष्टीने प्रवासादरम्यान कोणती काळजी घ्यायला हवी? कुठे टेस्ट बंधनकारक आहे? याची नियमावली तपासून पहा. दरम्यान कश्मीरच्या खोर्‍यावर मुघलांचा प्रभाव राहिल्याने तो त्यांच्या वास्तुकलेवर देखील पहायला मिळेल.