IRCTC refunds मिळण्याची प्रक्रिया आता होणार अधिक झटपट; तासाभरात रिफंड मिळणार - रिपोर्ट्स
IRCTC (PC - Facebook)

IRCTC च्या मार्फत ट्रेनचं तिकीट बूक करणार्‍यांना एक त्रास सर्रास होतो तो म्हणजे बॅंक अकाऊंट मधून पैसे तर गेले पण तिकीटचं बूक झाले नाही. यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रिफंड साठी पण खूप वेळ वाट पहावी लागते. पण आता या दृष्टीने काही चांगले बदल होत आहेत. लवकरच त्याची अंमलबजावणी देखील होणार आहे. तुमचं तिकीट बूक झाले नसेल किंवा तुम्ही तिकीट रद्द केले असेल तर तुमचे पैसे आता कमीत कमी वेळेत तुम्हांला परत मिळू शकणार आहेत.

India Today च्या रिपोर्ट्सनुसार, Centre for Railway Information Systems (CRIS),चा प्रयत्न आहे की एकदा तिकीट रद्द झाल्यानंतर किंवा बुक न केल्यावर पैसे परत करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत एकसमानता आणली जावी. त्यामुळे तासाभरामध्ये रिफंड दिला जाण्याची शक्यता आहे. रेल्वेकडून वेळेत रिफंड दिले जात नसल्याने अनेक प्रवासी वैतागून सोशल मीडीयामध्ये मनातील भावना व्यक्त करतात.

सध्या रिफंड मिळण्यास बराच वेळ लागत आहे. सध्या जर बुकिंग फेल झाले तर रिफंड दुसर्‍या दिवशी प्रोसेस केले जाते. त्यानंतर बॅंक किंवा पेमेंट सर्व्हिस ज्या माध्यमातून व्यवहार झाला आहे त्यानुसार पैसे परत देण्यास वेळ घेते. पण आता रेल्वेने हा वेळ कमी करण्यासाठी पर्याय काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. नक्की वाचा: IRCTC Started New Service: आता रेल्वे तिकीट कन्फर्म झाल्यानंतरच भरावे लागणार पैसे; आयआरसीटीसीने सुरू केली 'ही' सेवा .

कोणकोणत्या प्रकारामध्ये रिफंड मागितला जाऊ शकतो?

रेल्वेकडून प्रवासी विविध कारणांसाठी रिफंड मागू शकतो त्यामध्ये तिकीट आरक्षित न होणं, काही वेळेस ट्रेन उशिरा धावत असल्यास, एसी चालत नसल्याची तक्रार किंवा तुम्ही प्रवास रद्द करत असल्यास तुम्हांला तिकीट रिफंड मिळू शकते.

तिकीट बुकिंग करताना IRCTC कडून convenience fee आकारली जाते. हे शुल्क मात्र परत केले जात नाही.