प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Complete Wellbeing)

सध्याचा काळ हा इतका धकाधकीचा झाला आहे की, स्वतःसाठी वेळच मिळत नाही. पती पत्नी दोघेही दिवसभर आपापल्या कामात व्यस्त, एकमेकांची विचारपूस करायलाही वेळ नसतो. यातच वैयक्तिकरित्या दोघांना बरेच स्वातंत्र्यही प्राप्त झाले असते, अशात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर (Extramarital Affairs) ही मोठी समस्या होऊन बसली आहे. कामाच्या अडनिड्या वेळांमुळे किंवा कामाच्या वाढत्या व्यापामुळे घरात कमी वेळ दिला जातो. मात्र अशा परिस्थितीत कधी वाहवत जाऊन विवाहबाह्य संबंध तयार होतात हे समजतही नाही.  परंतु ते असे का होते, याचा कधी विचार केला आहे का? घरच्या सततच्या आणि वाढत्या कुरबुरींमुळेही विवाहबाह्य नात्यांमध्ये अधिक गुंतणे सुरु होते. काहीवेळा दोघांपैकी एकाला हे नाते नको असते मात्र भावनिक गुंतवणूक झाल्यावर ते नाते तोडणे अवघड होते. नाते टिकवायचे म्हणून टिकवणे याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरबद्दल असा थोडा जरी संशय आला तर लगेच मनमोकळेपणाने बोला आणि त्यावर तोडगा काढा. त्याआधी विवाहबाह्य संबंधांची काही कारणे जाणून घ्या जेणेकरून आत्मपरीक्षण करायला सोपे जाईल.

> रिलेशनमध्ये सेक्शुअल समाधान न मिळाल्यास महिला किंवा पुरुष इतरांकडे आकर्षित होतो. तसेच इतर पुरुषांसोबत अथवा स्त्रियांसोबत संबंध ठेवण्यास त्यांना काही चुकीचेही वाटत नाही. त्यामुळे आपले सेक्शुअल लाईफ नेहमी हेल्दी ठेवा. (हेही वाचा : सेक्समध्ये या आहेत महिलांच्या काही आवडत्या पोझिशन्स; ट्राय करण्याआधी खबरदारी नक्की घ्या)

> नात्यामध्ये एकटेपणा जाणवायला लागला, आपला पार्टनर आपल्याकडे पुरेसे लक्ष देत नाही याची जाणीव व्हायला लागली की आपसूकच बाहेर नाती जोडण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी इमोशनल रिलेशन्स कधी फिजिकल रिलेशनमध्ये कन्व्हर्ट होतात हे कळतसुद्धा नाही.

> कधी कधी समान वयाच्या व्यक्तीबरोबर लग्न न झाल्यास दोघांच्या वयातील तफावत नात्यातील दुराव्याचे कारण ठरते.

> एकमेकांची भांडणे, तफावत हळू हळू एकमेकांना दूर घेऊन जाऊ लागते. अशावेळी कटकटीपासून मुक्त होण्यासाठी बाहेर एखादे नाते प्रस्थापित केले जाते जेणेकरून तिथे समाधान मिळेल.

> स्वातंत्र्याची सवय लागल्यानंतर नात्यातील रोखटोक त्रासदायक वाटू लागते. सारखे प्रश्न विचारले जाणे, प्रत्येकवेळी बंधने घालणे, नात्याला नियम लावणे अशा कारणांनीही पुरुष शक्य तितके घराबाहेर राहायचा प्रयत्न करतो. साहजिकच तो एका नव्या नात्याच्या शोधात असतो जिथे त्याला स्वातंत्र्य मिळेल.

> कधी कधी पुरुषांना त्यांची पत्नी ही मोठी जबाबदारी वाटते. त्यात जर त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक गरजा पूर्ण झाल्या नाहीत, तर ती जबाबदारी घेण्यास ते टाळाटाळ करतात. अशावेळी बाहेर विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करून आपल्या गरजा पूर्ण करून घेतल्या जातात.

तर विवाहबाह्य संबंधांची ही काही मुख्य कारणे आहेत. याव्यतिरिक्तही वैयक्तिक कारणे असू शकतात. अशा प्रकारे बाहेर एखादे नाते तयार करण्याआधी आपल्या सध्याच्या नात्यात काही समस्या असतील तर त्या आपल्या पार्टनरशी संकोच न करता बोला, तुमच्या अपेक्षा बोलून दाखवा. शेवटी प्रत्येक नाते हे वेगळे असते, ते कसे टिकवायचे हे पती पत्नीवरच अवलंबून आहे.