Family Planning Tips: पहिल्या आणि दुस-या बाळाच्या जन्मामध्ये किती अंतर असणे अपेक्षित असते; जाणून घ्या सविस्तर
Family Planning (Photo Credits: PixaBay)

आई-वडिल होणं ही गोष्ट काही सोपी नाही. विशेषत: आई होणा-या महिलेच्या शरीरावर तिच्या जीवनात अनेक बदल होतात. पहिल्यांदा गरोदर राहिलेली महिलेला तो अनुभव जितका छान वाटत असतो तितका तो 9 महिन्यांचा प्रवासही खडतर वाटत असतो. शरीरात होणारे बदल त्या स्त्रीचे अख्खे आयुष्य बदलवून टाकत असतात. प्रसूती नंतर तिचे शरीर खूपच अशक्त झालेले असते. स्त्री बाहेरून दिसायला कितीही सुदृढ वाचत असली तरीही आतून तिचे शरीर थोडे कमकुवत झालेले असते. अशा वेळी तिला गरज असते ती आरामाची आणि मानसिक आधाराची. प्रसूती वेळी महिलेच्या शरीरावर झालेल्या शस्त्रक्रियांनी ती खूपच अशक्त झालेली असते. त्यामुळे तिची विशेष काळजी घेणे जरुरी असते.

अशातच काही पुरुषांना किंवा त्या महिलेच्या घरातील मंडळींना तिने लवकर दुसरा चान्स घ्यावा असे वाटत असते. काहींना मुलगी झाली आणि मुलगा हवा असेल किंवा काहींना मुलगा झाला आणि मुलगी हवी असेल म्हणून. मात्र यावेळी या दोन बाळंतपणात साधारण किती कालावधी असला पाहिजे हे जाणून घेणे खूपच गरजेचे आहे. तसे न केल्यास त्याचा विपरित परिणाम महिलेच्या शरीरावर होऊ शकतो. आई-वडिल होणं सोपं नाही, कसा अनुभवाल तो नऊ महिन्यांचा अद्भूत प्रवास? वाचा सविस्तर

वैद्यकीय सल्ल्यानुसार जाणून घ्या याबाबत काही विशेष टिप्स:

1) सर्वात आधी पहिल्या बाळंतपणानंतर महिलेचे शरीर दुस-या बाळंतपणासाठी सक्षम आहे का याची खात्री करुन घ्या.

2) पहिल्या 2 मुलांमध्ये कमीत कमी दीड ते दोन वर्षांचे अंतर असणे गरजेचे असते. जर त्यापेक्षा कमी अंतर असेल तर त्या महिलेला आपल्या बाळांना स्तनपान करताना अनेक समस्या येऊ शकतात.

हेदेखील वाचा- World Breastfeeding Week: स्तनपान करताना काय काळजी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर

3) जर दोन मुलांमध्ये कमी अंतर असले तर कधी कधी महिलेची प्री-मॅच्युअर प्रसूती होऊ शकते. यात बाळही खूप अशक्त असते. त्यामुळे 2 मुलांच्या मध्ये साधारण 2 वर्षांचे अंतर असले तर बाळ आणि आई या दोघांचीही प्रकृती उत्तम राहते.

4) जर दोन मुलांच्या जन्मांमध्ये ३ वर्षांचे अंतर असेल तर पहिला मुलगा थोडा समजूतदार होऊ लागतो. सोबतच मुलाला जन्म दिल्यानंतर आणि स्तनपान केल्यानंतर आईच्या शरीरात आलेली कमजोरी त्यावेळी पूर्णपणे ठीक झालेली असते. ह्याशिवाय मुलांच्या वयात अंतर असल्यामुळे आई वडील दोन्ही मुलांचे योग्यप्रकारे पालन करू शकतात.

5) वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, पहिल्या आणि दुसऱ्या मुलाच्या जन्मामध्ये जवळजवळ 24 महिन्यांचे अंतर असणे खूप गरजेचे आहे, कारण 24 महिन्यांमध्ये महिलेची शारीरिक प्रकृती पूर्णपणे ठीक झालेली असते.

त्यामुळे त्या महिलेच्या पतीने आणि तिच्या कुटूंबानी समाजाचा विचार न करता त्या महिलेचा विचार सर्वात आधी करावा. कारण दोन बाळांमध्ये कमी अंतर असले तर ते बाळ दगावण्याचीही अनेकदा शक्यता असते. ज्या मातेने त्या बाळाला जन्म दिला आहे त्या आईला हे दु:ख सहन करणे किती जड जाईल याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही.