
भारतीय योगी, आध्यात्मिक गुरु आणि ईशा फाउंडेशनचे संस्थापक अशी ‘सद्गुरू’ (Sadhguru) यांची ओळख आहे. खरे नाव जगदीश जग्गी वासुदेव होय. त्यांनी 1992 मध्ये ईशा फाउंडेशनची स्थापना केली, जी कोयंबटूर, तामिळनाडू येथे स्थित आहे. ही संस्था योग कार्यक्रम, सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रम राबवते. सद्गुरूंनी 1982 पासून योग शिकवायला सुरुवात केली. आता सद्गुरूंनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोफत 'मिरॅकल ऑफ माइंड' (Miracle of Mind) हे ध्यान ॲप लाँच केले. ॲपने लाँच झाल्यानंतर त्याने केवळ 15 तासांत 10 लाख डाउनलोड्सचा टप्पा ओलांडला, ज्यामुळे त्याने चॅटजीपीटी (ChatGPT) च्या विक्रमालाही मागे टाकले.
हे ॲप 26 फेब्रुवारी 2025 रोजी लाँच करण्यात आले होते आणि ते भारत, अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीसह 20 देशांमध्ये ट्रेंड झाले आहे. 'मिरॅकल ऑफ माइंड' ॲपमध्ये सात मिनिटांचे मार्गदर्शित ध्यान सत्र आहे, ज्यामुळे ते वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय झाले आहे. तसेच, यात एआय-आधारित तंत्र आहे, जे सद्गुरूंच्या शिकवणींमधून वैयक्तिक सल्ले देते. सद्गुरूंनी मानसिक आरोग्याच्या वाढत्या समस्यांवर प्रकाश टाकत, 'मिरॅकल ऑफ माइंड' ॲप लोकांना त्यांच्या अंतर्मनाशी जोडण्यास मदत करेल, असे म्हटले आहे.
Sadhguru’s Miracle of Mind App:
We are addressing everything in the world today except the inner wellbeing of the human being. We have either left it to chance or we try controlling outside situations to keep ourselves peaceful and joyful. The most effective solution, the greatest tool is with us; we only have… pic.twitter.com/FkRPQzuuxP
— Sadhguru (@SadhguruJV) February 28, 2025
हे ॲप इंग्रजी, हिंदी, तमिळ, रशियन आणि स्पॅनिश भाषांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर त्याची पोहोच वाढली आहे. 'मिरॅकल ऑफ माइंड' ॲप वापरून, वापरकर्ते त्यांच्या मानसिक स्वास्थ्यात सुधारणा करू शकतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात शांतता आणि स्थिरता अनुभवू शकतात. या अॅपला गुगल प्ले स्टोअरवर 4.9 रेटिंग मिळाले आहे. गुगल प्ले स्टोअरवरील अॅपच्या वर्णनानुसार, ते तुम्हाला ध्यान करण्यात मदत करेल आणि यासाठी तुम्हाला दररोज फक्त 7 मिनिटे घालवावी लागतील. यामध्ये, नवीन लोकांना ध्यान सुरू करण्यासाठी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन केले जाईल. सध्या हे अॅप आरोग्य आणि फिटनेस श्रेणीतील नंबर 1 मोफत अॅप आहे. (हेही वाचा: Indian Students Sleep Issues: 50%भारतीय विद्यार्थ्यांमध्ये झोपेची समस्या, अनेकांना निद्रानाश- अहवाल)
दरम्यान, सद्गुरू हे न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक आहेत. ते संयुक्त राष्ट्र आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर नियमितपणे बोलतात. पर्यावरण संरक्षणासाठी त्यांनी प्रोजेक्ट ग्रीनहँड्स, रॅली फॉर रिव्हर्स, कावेरी कॉलिंग आणि सेव सॉइल सारख्या उपक्रमांची सुरुवात केली आहे. 2017 साली, भारत सरकारने त्यांना पद्म विभूषण या दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले.