बॉडी बनवण्यासाठी लोक अनेकदा जिममध्ये (Gym) जातात आणि भरपूर व्यायाम करतात. अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी पूरक आहार घेणेदेखील सुरू करतात. अशावेळी काही सप्लिमेंट्सदेखील घेतली जातात. सप्लिमेंट्सबद्दल बोलायचे झाले तर, प्रोटीन (Protein) हे खूप महत्वाचे सप्लिमेंट आहे. शरीराची प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी ‘व्हे प्रोटीन’ नावाच्या सप्लिमेंटचे सेवन केले जाते. तर प्रोटीन शेक प्यायल्याने एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो? हा प्रश्न नक्कीच आश्चर्यकारक असला तरी प्रोटीन शेक प्यायल्याने एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याच्या प्रकाराने हा प्रश्न उपस्थित केला आहे.
या मृत्यूनंतर आता प्रोटीन शेकवर आरोग्याशी संबंधित इशारे लिहिण्याची सूचना देण्यात आली आहे. ही घटना ब्रिटनची राजधानी लंडनच्या पश्चिमेकडील इलिंग (Ealing) येथील आहे. इंग्लंडमधील एका मीडिया रिपोर्टनुसार, 15 ऑगस्ट 2020 रोजी प्रोटीन शेक प्यायल्यानंतर भारतीय वंशाच्या 16 वर्षीय रोहन गोधनियाची तब्येत बिघडली. त्यानंतर 3 दिवसांनी त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. रोहनचे वडील पुष्पा यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मुलगा खूप बारीक होता. आपले शरीर सुधारण्यासाठी तो प्रोटीन शेक घ्यायचा.
रोहनच्या मृत्यूच्या अलीकडील न्यायालयीन चौकशीत असे दिसून आले की, प्रोटीन शेकमुळे त्याच्यामध्ये एक दुर्मिळ अनुवांशिक स्थिती उद्भवली, ज्यामुळे मेंदूला नुकसान झाले आणि शेवटी त्याचा जीव गेला. शेक प्यायल्याच्या काही दिवसांनी रोहनची तब्येत झपाट्याने खालावली आणि त्याला तातडीने वेस्ट मिडलसेक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे 3 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
रोहनच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करताना त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नव्हते, कारण रोहनची प्रकृती स्थिर होण्यापूर्वीच त्याच्या शरीराचे अवयव प्रत्यारोपणासाठी दान करण्यात आले होते. मात्र आता समोर आलेल्या अहवालानुसार, प्रोटीन शेकमुळे रोहनच्या शरीरात ऑर्निथिन ट्रान्सकार्बामायलेस (OTC) ची कमतरता नावाचा दुर्मिळ जनुकीय आजार जन्माला आला. यानंतर रोहनचा रक्तदाब आणि शरीरातील अमोनियाचे प्रमाण गंभीर पातळीवर पोहोचले. यामुळे रोहनची तब्येत बिघडली व त्याच्या मेंदूला इजा झाली. उपचारादरम्यान 18 ऑगस्ट 2020 रोजी त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा: ट्रान्सजेंडर महिलेने केमिकल टाकून जाळले स्वतःचे लिंग; मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली केस स्टडी, जाणून घ्या कारण)
कार्यवाही दरम्यान, कोरोनर टॉम ऑस्बोर्न यांनी त्यांचे प्राथमिक मत सांगितले. ते म्हणाले की, प्रोटीन पेयांच्या पॅकेजिंगवर इशारा देण्याच्या आवश्यकतेबद्दल नियामक प्राधिकरणांना सूचित केले जावे. ओटीसी ही जरी दुर्मिळ स्थिती असली तरी, एखाद्याने असे पेय सेवन केल्यास आणि प्रथिने वाढल्याने त्याचे हानिकारक परिणाम झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.