एकीकडे जग कोरोना विषाणूशी सामना करीत आहे, तर दुसरीकडे इतर अनेक आजार डोके वर काढत असलेले दिसत आहेत. आता पश्चिम आफ्रिकन देश सेनेगल (Senegal) मधील पाचशेहून अधिक मच्छिमारांना समुद्रातून परत आल्यानंतर एक विशिष्ट त्वचा रोग (Skin Disease) झाला आहे. वरिष्ठ सरकारी आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. आरोग्य माहिती व शिक्षण विभागाचे राष्ट्रीय संचालक ओस्मान गुये (Ousmane Gueye) यांनी सांगितले की, राजधानी डाकार (Dakar) च्या आसपासच्या अनेक मासेमारी ठिकाणांवर मच्छिमारांना हा त्वचा विकार झाला आहे व आता त्यांना उपचारासाठी वेगळे ठेवण्यात आले आहे.
या त्वचा विकारामुळे मच्छिमारांच्या चेहऱ्यावर आणि काही प्रकरणांमध्ये त्यांच्या गुप्तांगांवर जखमा झाल्या आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये पुरुषांचे सुजलेले हात, फोड आलेले ओठ आणि मोठे मुरुम दिसत आहेत. एक आठवड्यापूर्वी या त्वचा विकाराचे पहिले प्रकरण नोंदवले गेले होते. या बाबत बोलताना गुये यांनी रॉयटर्सला सांगितले की, ‘हा संसर्गजन्य रोगाशी संबंधित त्वचारोग आहे. याबाबत आम्ही आणखी तपासणी करीत आहोत आणि लवकरच हे नक्की काय प्रकरण आहे ते आम्ही शोधून काढू.’ (हेही वाचा: घरच्या घरी करता येणाऱ्या कोरोना विषाणू चाचणीला US FDA ची मंजुरी; 30 मिनिटांमध्ये मिळणार रिझल्ट्स)
सेनेगलीज नौदल पाण्याचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवणार आहे. याआधी 17 नोव्हेंबर रोजी आरोग्य मंत्रालयाच्या अहवालात नमूद केले आहे की, या पुरुषांच्या शरीराच्या विविध भागांवर जखमा आहेत. या पुरुषांना काही प्रमाणात डोकेदुखीचाही त्रास होत होता तसेच काही जणांना ताप आल्याचेही नमूद केले आहे. प्राथमिक तपासणीत 12 नोव्हेंबर रोजी 20 वर्षांच्या मच्छीमाऱ्यामध्ये पहिल्यांदा या आजाराची लक्षणे दिसून आली. त्याच्या शरीरावर मोठे पुरळ आढळले होते, तसेच त्याचा चेहरा सुजला होता, ओठ कोरडे पडले होते आणि डोळे लालसर दिसत होते.