
जगभरात वाढत असलेली कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची संख्या हा मोठा चिंतेचा विषय आहे. प्रत्येक देशच यावर अनेक उपाययोजना राबवत आहे. या सर्वांमध्ये लोकांची कोरोनाची चाचणी हा फार महत्वाचा घटक आहे. मोठ्या प्रमाणावर चाचण्या झाल्या, तर रुग्ण संख्या समोर येऊन त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार सुरु होऊ शकतात. म्हणूनच आता अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (US FDA) घरीच करता येण्याजोग्या पहिल्या कोरोना व्हायरस चाचणीस (First Coronavirus Diagnostic Test) मान्यता दिली आहे. यामुळे अमेरिकन लोकांना वैद्यकीय सुविधा आणि तातडीची काळजी घेणारी केंद्रे व्यतिरिक्त स्वतः चाचण्या घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
एफडीएने मंगळवारी कॅलिफोर्नियास्थित लुसिरा हेल्थच्या चाचणी किटला (Lucira COVID-19 All-In-One Test Kit) मान्यता दिली. या चाचणीचा निकाल तुम्हाला 30 मिनिटांत मिळू शकतो. या चाचणीमध्ये स्वतः एका डबीमध्ये गोळा केलेला नाकातील स्वॅब नमुना घालून, ती चाचणी युनिटमध्ये ठेवली जाते. त्यानंतर 30 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळात तुमचा निकाल तुम्ही युनिटच्या लाइट-अप डिस्प्लेवर पाहू शकाल. यावरून लक्षात येईल की, एखादी व्यक्ती सार्स-कोव्ह-2 विषाणूसाठी सकारात्मक आहे का नकारात्मक. हा नवीन चाचणी पर्याय, साथीच्या रोगाचा धोका कमी करण्यासाठी आणि रोगाचा प्रसार रोखण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. (हेही वाचा: COVID-19 संसर्गाला 1 वर्ष पूर्ण; चीनच्या वुहान शहारात 17 नोव्हेंबर 2019 रोजी आढळला होता पहिला रुग्ण)
सध्या, केवळ प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेल्या चाचण्यांसाठीच या किटच्या वापरास परवानगी आहे. हे चाचणी किट सर्व वयोगटातील लोकांसाठी, डॉक्टरांची कार्यालये, रुग्णालये, तातडीची काळजी घेणारी केंद्रे आणि आपत्कालीन कक्षांसारख्या पॉईंट-ऑफ-केअर (POC) मध्ये वापरण्यासाठी अधिकृत आहे. सध्या अमेरिकेत हेल्थ वर्कर्सकडून मोठ्या प्रमाणावर चाचणी घेतली जाते, ज्यांची परीक्षणे प्रयोगशाळांमध्ये होतात. मात्र या किटमुळे लोकांना घराच्या घरी टेस्ट करता येणार आहे व जर का एखादी व्यक्ती कोरोनासाठी सकारात्मक आढळली, तर तिच्यावर लवकरात लवकर उपचार सुरु होऊ शकतील.