जगावर ओढावलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. चीनच्या (China) हुबेई (Hubei) ची राजधानी वुहान (Wuhan) येथे कोविड-19 (Covid-19) बाधित पहिली व्यक्ती 17 नोव्हेंबर 2019 रोजी आढळली होती. त्यानंतर हळूहळू कोरोनाचा प्रसार सर्वत्र झाला आणि या विषाणुने जगातील तब्बल 200 हून अधिक देशात आपली व्याप्ती वाढवली. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनुसार, संपूर्ण जगातील कोरोना बाधितांची संख्या 5.48 कोटींपेक्षा अधिक झाली आहे. तर मृतांचा आकडा 1,325,750 वर पोहचला आहे.
रिपोर्ट्सनुसार, हुबेई प्रांतात कोरोना व्हायरस संसर्गामुळे झालेल्या मृतांची संख्या 4512 असून यातील 3869 मृत्यू केवळ एकट्या वुहानमध्ये झाले आहेत. तर एकूण 68 हजार 134 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ज्यात वुहान शहरातील 50 हजार 339 लोकांचा समावेश आहे. मात्र सध्या कोरोना बाधितांची संख्या वाढत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र चीनमध्ये सोमवारी 15 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. या नव्या वाढीमुळे देशातील रुग्णसंख्या 3,716 इतकी झाली आहे.नॅशनल हेल्थ कमिशनने दिलेल्या माहितीनुसार, नव्या रुग्णांपैकी 6 रुग्ण सिचुआन येथे, 4 शांघायमध्ये, 3 गुआंग्डोंग आणि प्रत्येकी एक टियानजिन आणि शेडोंग येथे आढळून आले आहेत. सध्या यात कोणत्याही मृताची नोंद झालेली नाही.
विश्वविद्यालयाच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स आणि इंजिनयरींगच्या नव्या अपडेटनुसार, आज सकाळपर्यंत जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 54,826,773 वर पोहचला आहे. तर 1,325,752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सीएसएसईनुसार, कोरोना बाधितांच्या संख्येत अमेरिका जगात अग्रस्थानी आहे. येथील कोरोना बाधितांची संख्या 11,197,791 इतकी असून तब्बल 247,142 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येच्या क्रमवारीत ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये 165,798 मृतांची नोंद झाली असून 5,863,093 लोकांना कोविड-19 चा संसर्ग झाला आहे. (COVID19 वरील वॅक्सीन 94.5 टक्के प्रभावी, अमेरिकेतील Moderna Inc कंपनीचा दावा)
भारतातील कोरोना बाधितांची संख्या 8,845,127 इतकी असून या क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर देशात एकूण 130,070 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील सलग 44 व्या दिवशी कोरोना बाधितांच्या नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्या अधिक आहे. देशात आज कोविड-19 चे 29,164 नवे रुग्ण आढळून आले असून 449 जणांचा मृत्यू झाला आहे. या नव्या भरीमुळे कोरोना बाधितांचा आकडा 88,74,291 वर पोहचला असून 1,30,519 मृतांची नोंद झाली आहे. सध्या 4,53,401 सक्रीय रुग्ण असून मागील 24 तासांत ही संख्या 12,077 ने कमी झाली आहे. आतापर्यंत एकूण 82,90,371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यापैकी 40,791 रुग्णांना कालच्या दिवसांत डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, युरोपीय देशात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.