
लहान मुलांना होणाऱ्या गोवर या संक्रमत आणि घातक अशा आजाराविरुद्ध लढण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. या आजाराविरुद्ध लढण्यासठी पालघर जिल्ह्यात येत्या २७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम सुरु करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सुमारे आठ लाख बालकांना लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, विविध सामाजिक संस्था, महिला बालकल्याण व सर्वच विभागांचे सहकार्य घेऊन ही मोहीम राबवण्यात येईल. त्यामुळे आठ लाख बालकांना लसीकरण देण्याचे उद्दीष्ट पूर्ण होईल असाही विश्वास डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
गोवर रुबेला लसीकरण मोहीम आणि उद्दीष्ट
- २०२०पर्यंत गोवर निर्मूलन व रुबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे राज्य सरकारचे उद्दीष्ट.
- गोवर निर्मूलन व रुबेला आजाराचे नियंत्रण करण्यासाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन .
- २७ नोव्हेंबर गोवर निर्मूलन व रुबेला लसीकरण मोहिमेची सुरुवात.
- ही मोहीम पाच आठवडे चालणार आहे.
गोवर निर्मूलन व रुबेला लस कोठे उपलब्ध होऊ शकेल?
- पहिले दोन ते तीन आठवडे तालुक्यातील सर्व शाळांमध्ये लसीकरण सत्राचे आयोजन
- उर्वरित ३५ ते ४०टक्के लाभार्थींसाठी अंगणवाडी केंद्र व नियमित लसीकरण, उपकेंद्र येथे गोवर
- रुबेला लसीकरण उपलब्ध
- मोहिमे अंतर्गत सर्व लाभार्थींना गोवर रुबेला लसीचे एक इंजेक्शन देण्यात येणार
गोवरमुळे होणारे आजार - बालमृत्यू, आंधळेपणा, मेंदूज्वर
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे की, गोवर- रुबेला या आजारावर सध्यास्थितीत फारसा उपचारही नाही, परंतु गोवर- रुबेलाचे प्रमाण लसीकरणामुळे कमी करता येऊ शकते. त्यामुळे या लसीकरणाचा आपल्या पाल्याला सर्व नागरिकांनी लाभ द्यावा. तसेच, गोवर- रुबेला या आजाराविरुद्ध दोन हात करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा. आरोग्य विभागाने सुरु केलेल्या मोहिमेची शक्य तितकी माहिती नागरिकांनी जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवावी असेही अवाहन आरोग्य विभागाने केले आहे.