
रायगड (Raigad) जिल्ह्यातील मांडवा ते मुंबई (Mumbai) अशी बोट रुग्णवाहिका सुरु करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी ही माहिती दिली आहे. पालकमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बोट अलिबागमीधील मांडवा (Mandwa) ते गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) या दरम्यान सेवा देणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबतचे आदेशही नुकतेच निर्गमित केले आहेत.
रायगड जिल्ह्यातील नागरिकांकडून रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी सरकारने स्पीड बोट रुग्णवाहिका सुरु करावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. गेली अनेक वर्षे ही मागणी कायम होती. मात्र, अशा प्रकारचे बोट रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करुन द्यायची तर त्यासाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणावरचा होता. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर हा निर्णय प्रलंबित होता.
दरम्यान, जिल्हा वार्षिक आराखड्याच्या मध्यमातून ही यासाठी खर्च करण्यात यावा असे ठरले. त्याबाबतचा निर्णय जिल्हा नियोजन विभागाने घेतलाही होता. तसेच, या आराखड्यात नाविन्यपूर्ण योजनेचा समावेश करण्यात आला. मात्र, कोरोना व्हायरस संसर्गाचे संकट महाराष्ट्रवर आले आणि माशी शिंकली. या आराखड्यालाच कात्री लागली. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिक गेली अनेक वर्षे डोळे लाऊन बसलेल्या या योजनेला पुन्हा एकदा खो बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आता राज्य सरकारनेच ही सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रायगडकरांचे स्वप्न अखेर साकार होण्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. (हेही वाचा, ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळणार 500 नवीन रुग्णवाहिका; राजेश टोपे यांची माहिती)
कशी राबवली जाईल स्पीड बोट रुग्णसेवा
- एक वर्षाच्या कालावधीसाठी बाह्य यंत्रणेकडून प्रायोगिक तत्वावर बोट रुग्णसेवा सुरु होईल.
- ही सेवा मांडवा ते गेट वे ऑफ इंडीया दरम्यान स्पीड या दरम्यान कार्यन्वयित होईल.
- राज्याच्या आरोग्य विभागाकडून 7 ऑगस्टलाच याबाबतचे आदेश निर्गमित.
- बोट, रुग्णांसाठी आवश्यक यंत्रसामुग्री, औषधे, इंधन खर्च आणि कर्मचारी आणि वैद्यकीय
- अधिकाऱ्यांची नेमणूक या सगळ्यांची जबाबदारी बाह्य यंत्रणेवर असेल.
- निवीदा प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतरच रुग्णवाहिका सेवा दर निश्चिती होणार.
बोट रुग्णवाहिका उपक्रम हा रायगड आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. अनेक नागरिकांना याचा आरोग्यदाई फायदा होईल, असा विश्वासही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.